• Tue. Jul 22nd, 2025

नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा प्रतिसाद

ByMirror

Jan 12, 2024

माझा भारत विकसित भारत 2047 विषयावर युवकांनी भाषणातून घडविले सशक्त भारताचे दर्शन

उत्तम वक्तृत्वासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही -ॲड. सुनील तोडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- वक्तृत्व कौशल्य प्रत्येकासाठी आजच्या काळात आवश्‍यक आहे. उत्तम वक्तृत्वाने व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलते. संवाद कौशल्य आत्मसात केल्यास जीवनात आत्मविश्‍वास निर्माण होते. तर दुसऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता निर्माण होत असते. उत्तम वक्तृत्वासाठी वाचनाशिवाय पर्याय नसून, युवकांना वाचनाकडे वळण्याचे आवाहन ह.भ.प. ॲड. सुनील महाराज तोडकर यांनी केले.


युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडली. नगर-औरंगाबाद रोड येथील भीमा गौतमी वस्तीगृह येथे झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण करताना ॲड. तोडकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे, पोपट बनकर, शासनाचा राज्य युवती आदर्श पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, वस्तीगृह अधीक्षिका रजनी जाधव, जयेश शिंदे आदींसह विद्यार्थी व स्पर्धक युवक-युवती उपस्थित होत्या.


जयश्री शिंदे म्हणाल्या की, मोठ्या सभा जिंकण्याची कला भाषणाने निर्माण होत असते. वाचन व निरीक्षणातून नवीन गोष्टी शिकता येतात. उत्तम वक्तृत्व कौशल्य असल्यास आपले विचार समोरच्याला चांगल्या पद्धतीने समजत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोपट बनकर यांनी सक्षम युवक घडविण्यासाठी नेहरु युवा केंद्राने घेतलेली स्पर्धा प्रेरणादायी आहे. मोबाईलमध्ये गुंतलेला युवक वाचनापासून दुरावत आहे. परिणामी त्याचे वक्तृत्व गुण विकसीत होत नाही. युवकांना आपले विचार स्पष्टपणे मांडता यावेत व मनातील भीती दूर होण्याच्या उद्देशाने अशा स्पर्धांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेत युवकांनी माझा भारत विकसित भारत 2047 या विषयावर मतं माडली. तर आपल्या भाषणातून सन 2047 चा सशक्त व महासत्ता होणाऱ्या भारताचे दर्शन घडविले. युवकांचा देश म्हणून महासत्तेकडे वाटचाल करत असएल्या भारताचे 2047 मधील बलशाली भारताचे विविध विकासात्मक पैलूंचा उलगडा करुन भविष्याचा वेध घेतला. या स्पर्धेला युवक-युवतींचा प्रतिसाद लाभला. यामधील विजयी स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार असून, राज्यस्तरावर प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय 50 हजार व तृतीय क्रमांक 25 हजार रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, वैभव लोखंडे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *