पोलीस गस्त वाढवून, उपाययोजना करण्याची केमिस्ट असोसिएशनची मागणी
पोलीस उपाधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर व तालुक्यात मेडिकल फोडून चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीसांची गस्त वाढवून उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन चोरीच्या घटनांपासून मेडिकल व्यावसायिकांना भयमुक्त करण्यासंदर्भात निवेदन दिले.
शहर व तालुक्यात वारंवार मेडिकल फोडण्याचे घटना घडत असल्याचा गंभीर प्रश्नावर लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, सहसचिव मनीषा आठरे, अमित धाडगे, भरत सुपेकर, महेश आठरे, कमलेश गुंदेचा, मनोज खेडकर, खांदवे हर्षल, राकेश ओमासे, कैलास बडे, रवी खिळे, ज्ञानदेव यादव आदींसह केमिस्ट बांधव उपस्थित होते.
शहर व नगर तालुक्यात सर्व मेडिकल व्यावसायिक रुग्णांना औषधे उपलब्ध होण्यासाठी अहोरात्र सेवा देत आहेत. सध्या नगर शहर व तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, त्यामध्ये मेडिकल फोडण्याचा अधिक प्रमाणात समावेश आहे. नुकतेच दरेवाडी रोड, जामखेड नाका रोड व आनंदऋषीजी हॉस्पिटल परिसरात मेडिकल व्यवसायिकांची अंदाजे सहा ते सात दुकाने फोडण्यात आली. काही ठिकाणी दुकानातील रोख रक्कम व काही औषधी मालाची चोरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मेडिकल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर व नगर तालुक्यात मेडिकल व्यावसायिकांचे दुकान फोडण्याचे प्रमाण वाढले असताना, पोलीस दलाच्या वतीने शहर व नगर तालुक्यात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.