सतत त्रास व मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी
दिव्यांगाचे पीडित परिवार भयभीत
नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- मारहाण करून शारीरिक व्यंगावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम 2016 प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी जन्मजात अंध असलेले दीपक झोंबाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. घरा जवळ राहत असलेले काही गुंड प्रवृत्तीचे लोक दिव्यांग असल्याने जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जन्मजात अंध असलेले दीपक झोंबाडे मिरजगाव (ता. कर्जत) येथे कुटुंबीयांसह राहत आहे. त्यांच्या घरात वयोवृद्ध आई-वडील असून, त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या राहत्या घरासमोर वहिवाटीचा रस्ता आहे. घरा जवळ राहत असलेले काही व्यक्ती त्यांच्या घरा समोर कचरा आणून टाकतात, त्यामुळे दुर्गंधीचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. कचरा टाकणाऱ्यांना वेळोवेळी समजावून देखील ते ऐकत नाही विविध मार्गाने त्रास देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याच व्यक्तींनी घरासमोर सांडपाणी सोडल्याने मुले घसरून पडली, याबाबत विचारणा केली असता त्यांनी गचंडी धरून मारहाण केली व दिव्यांगत्वावर हिनावून जीवे मारण्याची धमकी दिली. भांडणे सोडवण्यास आलेल्या आई-वडिलांना देखील त्यांनी मारहाण केली. या प्रकरणाने सर्व कुटुंबीय भयभीत झाले आहे. मिरजगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता, संबंधित पोलिसांनी फिर्याद न घेता माघारी पाठवले. पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेल्याचा राग येऊन सदर व्यक्तींनी 8 जून रोजी घरामध्ये घुसून जाळून मारण्याची धमकी दिली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वेळोवेळी त्रास देऊन मारहाण करणारे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून जीवितास धोका असून, त्यांच्यावर दिव्यांग अधिनियम कायदा 2016 नुसार आजामीनपात्र गुन्हा नोंदवावा व ॲट्रॉसिटीचे कलम लावण्याची मागणी दिव्यांग असलेले दीपक झोंबाडे यांनी केली आहे.