• Thu. Jan 1st, 2026

महापालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व्हावे

ByMirror

Dec 20, 2023

नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

आयुक्तांसह महापौरांना पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त व महापौर यांना नुकतेच दिले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करुन स्वराज्य निर्माण केले. तर स्वराज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली. त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. गुरुवारी (दि.21 डिसेंबर) महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे.

या पुतळ्याचे अनावरण मराठा समाज योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होणार आहे. जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला बळ दिले. सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. मराठा समाजातील ते एक लढवय्ये कार्यकर्ते असले तरी, समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका सर्व समाजाला प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *