• Wed. Jul 2nd, 2025

नगरला रविवारी होणार वंजारी समाज महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

ByMirror

Aug 21, 2024

सामाजिक समतेचा संदेश घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी संमेलन राहणार खुले

राज्यातील लेखक, कवी व ज्येष्ठ साहित्यिक राहणार उपस्थित

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कृत समाज निर्मिती आणि सामाजिक समता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने वंजारी समाज महासंघाच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. निर्मलनगर, संत भगवान बाबा चौक येथील गंगा लॉन्स मध्ये हा सोहळा रविवारी (दि.25 ऑगस्ट) रोजी पार पडणार असून, या साहित्य संमेलनात राज्यातील लेखक, कवी व ज्येष्ठ साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. हा संमेलन सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती वंजारी समाज महासंघाच्या वतीने मंगळवारी (दि.20 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.


पत्रकार परिषदेसाठी वंजारी महासंघाचे संस्थापक गणेश खाडे, स्वागताध्यक्ष तथा विश्‍वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघव पाटील, सहस्वागत अध्यक्ष घनश्‍याम बोडखे, निमंत्रक जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर आदी उपस्थित होते.
वंजारी महासंघाचे संस्थापक गणेश खाडे म्हणाले की, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी वाचणारी व विचार करणारी माणसे निर्माण होण्याची गरज निर्माण झाली आहे. या साहित्य संमेलनातून सामाजिक विचार मंथन होणार आहे. वैचारिक प्रगल्भ समाज निर्माण व्हावा या उद्देशाने द्वैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. या संमेलनात संस्कृतीचे व विचारांचे आदान-प्रदान होणार आहे. या संमेलनात सर्वच समाजातील साहित्य, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्वागताध्यक्ष राजकुमार आघाव पाटील म्हणाले की, ऐतिहासिक शहरातील संमेलन यशस्वी होणार आहे. महाराष्ट्रातून नामांकित साहित्यिक येणार असून, नगरकरांना हे साहित्य संमेलन एक पर्वणी ठरणार आहे. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. नियोजन अंतिम टप्प्यात असून, रविवारी निर्मलनगर परिसरातून ग्रंथ दिंडी काढून संमेलनाला प्रारंभ होणार आहे. विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, सर्व समाज घटकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.


सहस्वागत अध्यक्ष घनश्‍याम बोडखे म्हणाले की, संमेलनाचे आयोजक वंजारी समाज महासंघ असून, सर्व जाती-धर्माच्या समाजाला या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. संमेलनासाठी आमदार संग्राम जगताप यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या संमेलनातून व सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर यांनी शहराला मिळालेले द्वैवार्षिक अधिवेशनाचे यजमानपद सर्व नगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे नाविन्यपूर्ण संमेलन यशस्वी होणार असून, सर्व शाखेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.


राजकारण विरहित संमेलन शहरात रंगणार असून, यामध्ये सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना निमंत्रित असणार आहेत. साहित्य, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या राज्यातील व्यक्तींना राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्यरत्न पुरस्कार व राष्ट्रसंत भगवान बाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले जाणार आहेत.

संमेलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार शिवाजीराव गर्जे, केदारेश्‍वर साखर कारखानाचे चेअरमन प्रताप (काका) ढाकणे, उद्योगपती बुधाजीराव पानसरे विविध सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी संध्याकाळी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *