नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याने पहिल्यांदाच नागरिकांना उपलब्ध होणार रस्ता
शहरातील रस्ते खड्डे मुक्त व दारोदारी रस्ते होण्याच्या दिशेने वाटचाल -रोहिणीताई शेंडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक 15 मधील रेल्वे स्टेशनच्या पलीकडे असलेल्या इंगळे वस्ती येथील रस्त्याचे काम अखेर नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले. पहिल्यांदाच येथील नागरिकांना घरा पर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे.
इंगळे वस्ती येथे होणाऱ्या अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, विद्याताई खैरे, योगीराज गाडे, दिपक खैरे, संतोष ग्यानाप्पा गौरव ढोणे, डॉ. चेमटे, आजिम शेख, अन्वर सय्यद, पप्पू लांडगे, संजय धीवर, विकी खराडे, राजेश मगर, उत्तम इजगत, बंटी खैरे, काका अवचर, संजय गायकवाड, विजया खराडे, शबाना शेख, वैशाली पारखे, मोनिका धीवर, पूजा सोनवणे, रेखा गायकवाड, सुनिता बडगर, सुमय्या शेख, अलका यादव, हिराबाई धीवर, आफरीन शेख, अर्चना इजगज, भारती शेंगदाळे, रुपाली जगताप, शिरीन शेख आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी काँक्रिटीकरणाला प्राधान्य देऊन रस्त्यांचे काम मार्गी लावण्यात येत आहे. डांबरीकरणापेक्षा काँक्रिटीकरणाचे रस्ते अधिक काळ टिकत असल्याने लोकवस्ती मधील रस्ते काँक्रिटचे करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम देखील प्रगतीपथावर असून, शहरातील रस्ते खड्डे मुक्त व दारोदारी रस्ते होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर इंगळे वस्ती मधील ड्रेनेज लाईनचा प्रश्न देखील गंभीर असून, रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर ड्रेनेजलाईनसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
नगरसेवक प्रशांत गायकवाड म्हणाले की, रेल्वे लाईनची अडचण असल्याने ड्रेनेजलाईनचा प्रश्न देखील प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. येथील नागरिकांना किमान घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा या उद्देशाने रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. महापौरांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांनी आभार मानले. संभाजी कदम यांनी भाजपच्या खोट्या घोषणा व आश्वासनांना बळी न पडता महाराष्ट्रात पुन्हा उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी पक्षाच्या मागे उभे रहावे. सर्वसामान्यांचे हिताचे विचार करणारे सरकार आल्याशिवाय जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुवर्णाताई जाधव म्हणाल्या की, प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी महापौरांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन विकास कामे मार्गी लागत आहे. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन पाणी, रस्त्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यात येतं आहे. प्रभाग समस्या मुक्त करण्याचा संकल्प असून, निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करुन विविध विकास कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
इंगळे वस्ती रेल्वे स्टेशनच्या पलीकडे असल्याने हा परिसर दुर्लक्षीत राहिला होता. कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर अनेक नागरिक चिखलमय रस्त्यावर घसरुन देखील पडले. या पावसाळ्यात देखील मोठी त्रास नागरिकांना सहन करावा लागला. या नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन नगरसेवक गायकवाड यांनी पाठपुरावा करुन रस्त्याचे काम मार्गी लावले. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच रस्ता होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तर महापौर शेंडगे यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व ते सोडविण्याचे आश्वासन दिले.
