ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ
विविध प्रश्न नियोजनात्मक पध्दतीने सुटणार -सुरज शिंदे
नगर (प्रतिनिधी)- तब्बल चाळीस वर्षानंतर वैदुवाडी येथील गुरुकृपा कॉलनी मधील ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लावण्यात आले आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची सोय होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शिंदे यांच्या पाठपुराव्याने सदर ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
वैदुवाडी येथील गुरुकृपा कॉलनी, जैन मंदिर परिसरात ड्रेनजलाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन सुरज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, अतुल हातवळणे, सुधीर धर्माधिकारी, अतुल देशमुख, हर्षद आनेचा, आरपीआयच्या जयाताई गायकवाड, नंदा आनेचा, वैशाली जोशी, अमृता बेद्रे, शोभा मुळे, रेखा पुरोहित आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, गुरुकृपा कॉलनीकडे दुर्लक्ष केले गेल्याने या भागातील ड्रेनेजलाईनचा प्रश्न 40 वर्षापासून सुटला नव्हता. सुरज शिंदे यांनी पुढाकार घेऊन आमदार जगताप यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविला आहे. प्रभागातील विविध विकास कामासाठी त्यांचा सातत्याने असलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करुन त्यांनी आभार मानले.
सुरज शिंदे म्हणाले की, शहरासह उपनगरांचा विकास आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून होत आहे. शहराप्रमाणेच त्यांनी उपनगरसाठी निधी उपलब्ध करुन विविध प्रश्न सोडविण्याचे कार्य केले आहे. या परिसरातील विविध प्रश्न नियोजनात्मक पध्दतीने सुटणार असल्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.