काचबिंदूमुळे दोन्ही डोळ्यांना आलेले अंधत्व आणि अठराविश्व दारिद्रायाची परिस्थितीत घडवली मोफत शस्त्रक्रिया
नगर (प्रतिनिधी)- शेतात मुलासह मोलमजुरी करुन सुरु असलेला उदरनिर्वाह, कुटुंबात अठराविश्व दारिद्रय, कर्ज घेऊन लावलेले मुलीचे लग्न अशा बिकट परिस्थितीत बार्शी (जि. सोलापूर) येथील 72 वर्षीय शेतकरी भाऊसाहेब गीते यांना दोन्ही डोळ्यांना काचबिंदूमुळे अंधत्व आले. उपचार आणि खर्चिक शस्त्रक्रियेसाठी खिश्यात दमडी नसलेल्या गीते यांच्यावर फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत काचबिंदूची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. अन अंधारलेले त्यांचे जीवन प्रकाशमय झाले असून, त्यांना उजव्या डोळ्यांनी सर्वकाही पाहता येऊ लागले आहे. अंधत्व आलेल्या आनखी एका ज्येष्ठ नागरिकांचे जीवन प्रकाशमान करुन त्यामध्ये रंग भरण्याचे काम फिनिक्सने केले आहे.
मागील आठवड्यात नागरदेवळे (ता. नगर) येथे झालेल्या फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी भाऊसाहेब गीते नातेवाईकांसह नगर मध्ये आले होते. त्यांनी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांची भेट घेऊन त्यांना असलेली हालाखीची परिस्थिती सांगितली. बोरुडे यांनी तात्काळ नेत्र तज्ञ डॉक्टरांना विनंती करुन त्यांची तपासणी करुन घेतली व त्यांना पुणे येथील बुधराणी हॉस्पिटमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
उजव्या डोळ्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया होऊन ते पुन्हा नगरला आले. एका डोळ्यांनी त्यांना दिसू लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आल्यावर त्यांनी पहिले बोरुडे यांची भेट घेऊन त्यांना आशिर्वाद दिले. डोळ्यांपुढील अंधकार दूर झाल्याने आनंदाने त्यांचे डोळे पाणावले.
काचबिंदूमुळे त्यांना दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले होते. लवकरच त्यांच्या डाव्या डोळ्यावर देखील शस्त्रक्रिया करुन त्यांना दोन्ही डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती जालिंदर बोरुडे यांनी दिली. या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर देखील मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
