रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बिंगोने युवा वर्ग जुगार व व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा पिढीला उध्वस्त करणाऱ्या बिंगो जुगारवर जिल्ह्यात पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बिंगो जुगार जोमात सुरू आहे. ऑनलाइन बिंगोमुळेच अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत असून, युवा वर्ग जुगार व व्यसनाच्या आहारी जात आहे. बिंगो जुगारवर बंदी असताना देखील त्यावर कारवाई होत नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या आशीर्वादाने बिंगो चालकांना अभय देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जिल्ह्यात शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बिंगो जुगारवर कारवाई करुन ते कायमचे बंद होण्यासाठी पोलीस प्रशासनाने भूमिका घेण्याची मागणी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 6 डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.