नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील नागरी वसाहतीलगत व बाजारपेठेत फटाका मार्केटला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी नागापूर फटाका असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर बाजारपेठेत थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या स्टॉलमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका हद्दीतील नागापूर येथे कापडाचे, किराणा सामान, हॉटेल व भाजीपाल्याचे दुकान आहेत. सदर ठिकाणी मोठी बाजारपेठ असून, नागरिकांची दररोज वर्दळ असते. नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या या बाजारपेठेत एमआयडीसी भागातील नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करत आहे.
मात्र महापालिकेच्या नगररचनाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर जागेची पहाणी न करता फटाका स्टॉलच्या 11 दुकानांना परवानगी दिली आहे. यामुळे मोठी दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सिमोन भाकरे, अभिषेक सकट, शेखर बेरड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
