• Tue. Oct 14th, 2025

नेप्ती मंडळातील दहा गावातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याना पावसाने उघडीप दिल्यामुळे वेग

ByMirror

Oct 3, 2025

चिखल तुडवत बांधावर जाऊन पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा


आतापर्यंत 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव ,जखणगाव, हिवरे बाजार, टाकळी खादगाव, आदी दहा गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याना वेग आला आहे .संबंधित अधिकारी चिखल तुडवीत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा करीत असल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे. शेत पीक व फळबागांचे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत अशी माहिती नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांनी दिली .


सध्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.हे काम उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर तहसीलदार यांच्या आदेशानुसार राबविले जात आहे. प्रत्येक गावात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या आदेशानुसार नेप्ती मंडळातील नेप्तीच्या ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा रांधवण, निमगाव वाघाचे ग्राम महसूल अधिकारी विनायक दिक्षे, हिंगणगावचे ग्राम महसूल अधिकारी दिपक झेंडे, जखणगावच्या ग्राम महसूल अधिकारी दिपाली विधाते, हिवरे बाजारचे ग्राम महसूल अधिकारी श्रीकृष्ण निमसे, टाकळी खातगावच्या ग्राम महसूल अधिकारी रूपाली म्हस्के यांनी समितीतील इतर नियुक्त सदस्यांसह आपल्या गावात पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.


या गठीत समितीने नेप्ती गावात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी भानुदास विठोबा फुले यांच्या कांदा पिकाची पाहणी केली. यावेळी मंडळ अधिकारी प्रताप कळसे, कृषी अधिकारी रावसाहेब नवले, ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा रांधवण तसेच माजी सरपंच संजय जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, हरणाबाई फुले, ,प्रकाश बेल्हेकर, अरुण बेल्हेकर ,राजू साळुंके ,सिताराम बेल्हेकर ,नामदेव बेल्हेकर, अर्णव बेल्हेकर, यश बेल्हेकर ,सुरज साळुंके, जालिंदर बेल्हेकर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सध्या मंडळातील सुमारे 3 हजार शेतकऱ्यांपैकी 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यात सुमारे 1714 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे नोंदवले गेले आहे. याशिवाय 4 घरांची आणि 4 विहिरींची पडझड झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले असून त्यांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत. नेप्ती महसूल मंडळातील 681 शेतकऱ्यांच्या सुमारे 501 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे अद्याप बाकी असून हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण केले जाणार आहेत असे मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांनी सांगितले .


पंचनामे तातडीने सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडून तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *