• Wed. Oct 15th, 2025

सदोबाचा डोंगर हिरवाईने बहरणार

ByMirror

Sep 3, 2025

जय हिंद फाऊंडेशनतर्फे वटवृक्ष लागवड


पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटन क्षेत्राला चालना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील ससेवाडी आगडगाव-कोल्हार रोडवर असलेल्या सदोबाचा डोंगर, वाळूचा डेंबा परिसरात जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने तब्बल 21 वटवृक्षांची लागवड करण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्य जीवसृष्टी असून, उन्हाळ्यात वन विभागाच्या वतीने पानवठ्यात पाणी सोडले जाते. या पानवठ्याच्या आजूबाजूला वृक्षारोपण करण्यात आल्यानं वन्यजीवांसोबतच यात्रेकरूंनाही सावलीचा आधार मिळणार आहे.


जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांनी सांगितले की, सदोबाचा डोंगर हा गर्भगिरी पर्वतरांगेचा अतिशय सुंदर आणि उंच भाग आहे. या परिसरातून आगडगाव-कोल्हार-चिचोंडी मार्गे अनेक भक्त प्रवास करतात. एका बाजूला आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान, दुसऱ्या बाजूला कोल्हुबाई माता गड व आदर्श गाव कोल्हार, तर तिसऱ्या बाजूला ससेवाडीतील सीना नदीचा उगम व महादेव मंदिर या ठिकाणांमुळे हा परिसर धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. वृक्षलागवडीमुळे येथील पशुपक्ष्यांना आधार मिळेल, तसेच यात्रेकरूंना उन्हाळ्यातील कडक उन्हापासूनही दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


माजी सरपंच संजय ससे म्हणाले की, या उपक्रमामुळे सदोबाचा डोंगर हिरवाईने बहरणार आहे. पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल आणि परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्यासही मदत होणार असल्याचे ते म्हणाले. जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने कोल्हार गावच्या डोंगरावर 25 वटवृक्षांचे पॉईंट तयार करण्यात येत असून, वडाची फळे पक्ष्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत. जवळच पानवठा असल्याने पाण्याची सोयही उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचे जीवन अधिक सुखमय होणार असल्याची माहिती देण्यात आली.


या वृक्षारोपण उपक्रमाप्रसंगी कोल्हार गावचे ज्येष्ठ शेतकरी रखमाजी पालवे, आजिनाथ पालवे, भाऊ पालवे, ससेवाडीचे ग्रामस्थ व माजी सरपंच संजय ससे, चेअरमन बाबा ससे, रोहिदास ससे, सावित्री ससे, युवा नेते संकेत जरे, सचिन जरे, माजी सरपंच अरुण ससे, दत्तू जरे, व्यंकटेश आठरे, जय हिंदचे शिवाजी पालवे, सचिन पालवे, संतोष मगर, लक्ष्मण ससे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संतोष मगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *