स्वप्न भंगल्याची अण्णा हजारेंनी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करुन, अहवालात नाव व फोटो छापल्याने संचालकांवर नाराजगी व्यक्त
सभासद व विरोधी संचालकांनी विचारला गैरकारभाराचा जाब
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या आयोजित वार्षिक सभेत संचालकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सभासदांनी प्रचंड गदारोळ घातला. सहकार खात्याकडून संचालक मंडळावर नुकत्याच निघालेल्या 88/1 च्या नोटिसाचें प्रकरण गाजले, तर नोकरभरती, भ्रष्टाचार कर्ज प्रकरणाबाबत सभासदांनी जाब विचारून सत्ताधारी संचालकांची भंबेरी उडविले. ऑडीट रिपोर्ट नसल्याने व इतर मुद्द्यावर सभेत चांगलीच खडाजंगी झाली.
शनिवारी (दि.30 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता सभा होती, पण या वेळेत बँक पदाधिकारी उपस्थित नसल्याने सभासदांनी माईकचा ताबा घेतला व कान्हूरचे जेष्ठ सभासद सुभाष ठुबे मेजर यांच्या अध्यक्षतेखाली सभा चालू करत सर्व विषय नामंजूर केले. तत्पूर्वी बँकेत बसलेल्या चेअरमन व्यवहारे व काही संचालकांना कर्मचाऱ्यांनी सभा सुरू झाल्याचे व विषय नामंजूर केल्याचे सांगितल्यावर घाई घाईत अध्यक्ष व्यवहारे व काही संचालक सभा ठिकाणी हजर झाले. तो पर्यंत बाळासाहेब नरसाळे, विक्रमसिहं कळमकर, कॅप्टन विठ्ठल वराळ विनायक गोस्वामी यांनी माईकचा ताबा घेऊन सभासदांसमोर संचालक मंडळाच्या गैरकृत्याचा पाढा वाचला. सहकार खात्याने संचालक मंडळाला पाठवलेली 88/1 ची नोटिस, नोकरभरती, भ्रष्टाचार, कर्ज प्रकरणाबाबत जाब विचारून सत्ताधारी संचालकांची भंबेरी उडविली. त्या नंतर अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी प्रस्तविकेला सुरुवात केली. बँकेची कार्यपद्धती तसेच सभासदामध्ये बँकेविषयी होत असलेला अप्रचार, ठेवी या सर्व मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला. मात्र मीच म्हणजे सर्व काही अशा अविर्भावात त्यांनी प्रास्ताविक सुरू केल्याने त्यांच्या प्रस्ताविकावर सभासदांनी आक्षेप घेतला.

संचालक मंडळावर अण्णांची नाराजी
बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेले जेष्ठ समासेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी फोनवर वार्षिक सभेत संचालकांशी संवाद साधून नाराजी व्यक्त केली. अण्णा म्हणाले की, बँकेची एका बाजूला कलम 83 व 88 अन्वये चौकशी सुरु असताना अशा अवस्थेत वार्षिक अहवालात माझे फोटो व नाव छापणे योग्य नाही. बँकेसाठी फार मोठे स्वप्न पाहिले, मात्र ते भंगले असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बँकेची प्रतिमा संचालक मंडळाकडून मलीन
बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष व्यवहारे सभासादावर धावून गेले. व प्रत्येक प्रश्नावर अध्यक्ष व सभासद यांच्यात वाद झाला. अध्यक्ष व्यवहारे यांचे सभेत घोटाळयाबाबत उत्तरे अपेक्षित असताना सभा उरकती घेतली. बँक आणि ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असाव्यात ही आमची भूमिका आहे. ही बँक सर्व सामान्यांची आहे. कुणाची खासगी मालमत्ता नाही. याचा विचार करून बँकत मंडळाने कारभार करायला पाहजे होता. परंतु या मंडळाने गैरकारभार करत अण्णा व सभासदांचा विश्वास घात केला असल्याचा आरोप सैनिक बँक बचाव कृती समितीचे बाळासाहेब नरसाळे, विक्रमसिहं कळमकर, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, गोरख आजबे, संपत शिरसाठ, ब्रिगेडयर भोरे, मेजर सुभाष ठूबे यांनी केला आहे.
गैरकारभार उघड केला म्हणून सभासदात्व रद्द करण्याचा व्यवहारेचा केविलवाणा प्रयत्न -विनायक गोस्वामी
सैनिक बँकेत व्यवहारे यांनी पदाच्या माध्यमातून बँकेत अनेक गैरव्यवहार केले, त्यामुळे त्यांच्यावर 6 आर्थिक गुन्हे दाखल आहेत. तसेच कलम 88 खाली कारवाई अंतिम टप्प्यात आहे. 1 कोटीं 79 लाख रुपयांचा अपहार प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होऊन जबाबदारी निश्चित होणार आहे. मी सर्व प्रकरणे उघड केली. व्यवहारे यांना नैराश्य आल्याने हतबल होऊन आपल्या नातलग सभासदांना बोलवून माझ्या सभासद रद्द बद्दल ठराव मांडला आहे. मुळात बँकेचा ऑडिट रिपोर्ट नसताना सभा घेतली गेल्याने ही सभाच बेकायदेशीर आहे. त्यामुळे घेतलेले सर्व ठराव हे बेकायदेशीर आहेत. मी नेहमीच बँकेच्या हितासाठी व बँक वाचवण्यासाठीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या आहेत. व्यवहारे म्हणतात सभासदांचाचहा सुद्धा घेतला नाही तर 6 गुन्हे दाखल व कलम 88 दाखल कशी? बँकेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णासाहेब हजारे यांनी सभेत व्यवहारे व संचालकांवर अविश्वास व्यक्त केल्याने तो राग मनात ठेवून माझा सभासदत्व रद्द केले हे बेकायदेशीर असून खुळचटपणाचे व दिशाभूल करणारे आहे. सदरचा निर्णय सूडबुद्धीने व बेकायदेशीरपणे घेण्यात आला आहे.