• Fri. Sep 19th, 2025

सावेडीच्या गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिव्यांची सोय करावी

ByMirror

Jan 12, 2024

राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून स्थानिक महिलांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

खड्डेमय व अंधकारमय रस्त्यामुळे महिला वर्ग भितीच्या सावटाखाली -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची झालेली दुरावस्था व पथदिव्यांची सोय नसल्याने स्थानिक महिलांसह राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न मार्गी लावण्याचे निवेदन दिले. तर सदर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लाऊन त्या रस्त्यावर पथदिव्यांची सोय करण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, गायत्री उपाध्य, प्रणिता सूर्यवंशी, रुचिरा सावळकर, प्रणाली बागडे, सुनंदा सोमानी, शितल पावसे, प्रीती संसारे, विजया विजन, लीना विजन, सुरुची नाईक, प्रतिभा ब्राह्मणे, सोनल जरे, सोनाली गोडसे, स्वाती एनगुल, संजोग कचरे, अश्‍विनी कुलकर्णी, प्रगती निगम, भारती पंजवानी आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


सावेडी, पाईपलाईन रोड जवळील गावडे मळा येथील मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. खड्डेमय व चिखल साचलेल्या रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. अनेक परिसराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून, या रस्त्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात मोठी लोकवस्ती असून, 12 ते 13 कॉलनींना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. कादंबरी नगरी, गोकुळधाम सोसायटी, इस्कॉन मंदिर, ध्यान मंदिर नगर, जय मल्हार पार्क या भागातील नागरिकांना या रस्त्यावरुन दररोज रहदारी करावी लागते. रस्ता खराब असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिला व विद्यार्थी वर्गाची तारांबळ उडत आहे. तर या रस्त्यावर रात्री पथदिव्यांचा उजेड नसल्याने महिलांची छेड काढणे, चोरी व लुटमारचे प्रमाण वाढले आहे. तर अंधारामुळे देखील अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, यामध्ये अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना दुखापत झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची दुरुस्ती करुन पथ दिव्यांची सोय करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात आली आहे.



सावेडीच्या गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंधार पडल्यावर महिलांना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. तर रात्री घरी येताना खड्डेमय रस्ते व त्यामध्ये अंधार असल्याने महिला वर्ग भितीच्या सावटाखाली वावरत आहे. मनपा प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिव्यांची व्यवस्था करावी. -इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *