पीपल्स हेल्पलाइनचा दावा
लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून सत्तापेंढाऱ्यांनी महाराष्ट्रात वेड्या बाभळीची शेती व्यापक केल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायदेशीर रीतीने घाऊक मतदार अक्कलमारी करणाऱ्यांविरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांना पीपल्स हेल्पलाइनने लाडकी माई भूमीगुंठा योजना सुचवली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीला फटका बसल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या योजनेकडे शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी दुर्लक्ष केले त्यातून लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून सत्तापेंढारी यांनी पूर्णपणे महाराष्ट्रात वेड्या बाभळीची शेती व्यापक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाडकी बहिण या कायदेशीर मतदार अक्कलमारीचा प्रयोग मध्यप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रात यशस्वी झाल्याने थोड्याच दिवसात संपूर्ण भारतात आणि शेजारच्या राष्ट्रांमध्ये पोहोचल्या शिवाय राहणार नाही. यातून इंग्रजांनी राबवलेल्या शोषण पद्धतीचा वापर स्वतंत्र्योत्तर 77 वर्षात देखील चालू राहणार आहे. भारतात लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तत्वज्ञानावर आधारित शासन शिवाजी महाराजांनी यशस्वी केले. कारण उन्नत चेतनेवर आधारित कायद्याचे राज्य त्यांनी राबविले. त्यामध्ये आपण सर्व, आपणा सर्वांचे व आपणा सर्वांसाठी हे तत्व होते. यापूर्वी शोषक राजांनी मी, माझे व मलाच या तंत्राचा वापर केला. त्याचप्रमाणे सध्याच्या राज्यकर्त्यांनी आंम्ही, आंम्हाला आणि आमच्यासाठी हे तंत्र सुरू ठेवले आहे. त्यातून राजकारण आणि धर्म यांच्या सीमारेषा पुसून टाकून मतदान अक्कलवारी टोकाला पोहोचली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनूने कायद्याच्या माध्यमातून भारतातील स्त्रीया आणि दलितांवर सामाजिक आणि आर्थिक दास्य लादले. त्यातून आर्थिक दुबळे झालेल्या मतदारांचा मध्य प्रदेशांमध्ये निर्माण झालेल्या शकुनी काव्याने मतदार अक्कलमारी व्यापक झाली आहे आणि त्यातूनच वेड्या बाभळीची शेती राजकारण आणि धर्म प्रांतांमध्ये राबवली जात आहे. एकंदरीत उन्नत चेतना पायदळी तुडवून राज्यकर्ते आणि धर्मप्रमुख हे सत्तापेंढारी कुबेरशाही निर्माण करुन देशात राबवीत आहे. कोट्यावधी लोकांना राहण्यासाठी घरे नाही, 70 टक्के लोक आर्थिक विवंचनेत आहेत याचा गैरफायदा सध्याच्या राज्यकर्त्यांनी घेतला असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
राजकीय पक्षाच्या नेत्याकडे उन्नत चेतना आणि मुत्सद्देगिरी नसल्यामुळे आणि लबाडीने सत्ता मिळवणे, खोटी प्रतिष्ठा मिळवून आणि जनतेची संपत्ती घरी घेऊन जाणे यावर सगळ्यांचे लक्ष असल्यामुळे 21 व्या शतकातील आणि स्वतंत्र्याच्या 75 वर्षात नंतर देखील भारतात लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती सार्वजनिक जीवनात राबविता आलेली नाही. या देशात कायद्याने प्रतिखासदार आणि प्रति आमदार निर्माण करुन आमदार व खासदारांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार देणाऱ्या तंत्राचा वापर लोकशाही संरक्षण कायद्यामध्ये सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.