त्या पोलीस अधिकाऱ्यासह व आरोपींची नार्को टेस्टची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचे गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केले आहेत. वैभवचा अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला व मृतदेह केतकाई परिसरात जाळून टाकण्यात आला. या घटनेची माहिती पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याला असूनही त्याने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुधवारी (दि. 25 जून) वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सदर गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा व सदर पोलिस अधिकाऱ्याची आणि आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात मयत वैभवची आई सीमा नाईकवाडी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनिफ शेख, ॲड. योगेश गुंजाळ, जे.डी. शिरसाठ, देवीदास भालेराव, गणेश राऊत, प्रसाद भिवसने, राजीव भिंगारदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी वैभव नाईकवाडी याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह केतकाई परिसरात नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाळून टाकला. विशेष म्हणजे या मारहाणीचे फोटो व व्हिडीओ आरोपींनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला पाठवले होते. तरीही पोलिस अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन निवांत बसून राहिले. अन्यथा वैभवचा जीव वाचू शकला असता. वैभवच्या अपहरणाच्या दिवशी त्याच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु त्या ठाण्यातूनही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे दोन पोलिस ठाण्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे एका अल्पवयीन मुलाचा बळी गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना आर्थिक स्वार्थापोटी व्हीआयपी वागणूक दिली असून, त्यांना या गुन्ह्यातूअ वगळुन टाकले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स, सीडीआर रेकॉर्ड, कॉल रेकॉर्डिंग आणि बँक खात्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा व सदर पोलिस अधिकाऱ्याची आणि आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.