बालविवाह रोखण्यासाठी उडान प्रकल्पाचा लोकार्पण
उडान प्रकल्प बालविवाह मुक्तीसाठी राज्याला दिशा देणारा ठरणार -सायली पालखेडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उडान प्रकल्प बालविवाह मुक्तीसाठी राज्याला दिशा देणारा ठरणार आहे. महाराष्ट्र बालविवाह मुक्त होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. हे करताना बालकांच्या हक्कासाठी देखील कार्य होणार आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधावा. मुलांशी संवाद साधल्यास ते मनमोकळे आपल्या अडचणी सांगू शकतील. पालकांनी मुलांमध्ये मैत्रीचा विश्वास निर्माण केल्यास त्यांना बाहेरची गरज न पडता ते भरकटणार नाही. मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहन राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी केले.

स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त बालभवन मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पालखेडकर बोलत होत्या. तसेच यावेळी बालविवाह मुक्त जिल्हा घडविण्यासाठी स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे लोकार्पण देखील करण्यात आले. गांधी मैदान, चित्रा टॉकीजसमोरील स्नेहालय भवन येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, ॲड. बागेश्री जरंडीकर, राजीव गुजर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समिती सदस्या ॲड. अनुराधा येवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख, बालरोग तज्ञ डॉ. सुचित तांबोळी, स्नेहालयाचे हनिफ शेख, संदीप कुलकर्णी, प्रविण मुत्त्याल, अनामप्रेमचे अजित माने आदींसह बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात ॲड. बागेश्री जरंडीकर म्हणाल्या की, स्नेहालय समाजातील वंचित, पीडित, बालके व स्त्रियांसाठी योगदान देत आहे. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य सुरु आहे. कोरोनानंतर बालविवाहमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याला प्रतिबंध करण्यासाठी उडानच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. समाजात बालविवाहाच्या दुष्परिणामाची जनजागृती करून सर्वांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट यशस्वी होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. बालभवनच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. स्नेहालय परिवाराच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

राजीव गुजर यांनी उच्च शिक्षणाने ध्येय गाठा, वेळेला महत्त्व देऊन जीवनात यशस्वी होण्याचा मुलांना संदेश दिला. डॉ. सुचित तांबोळी म्हणाले की, प्रत्येक बालकाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मुलांमधील कलागुण ओळखून पालकांनी त्या दिशेने आपल्या मुलांचा विकास साधावा. आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना जीवनाचा खरा आनंद लुटता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरीचे अध्यक्ष माधव देशमुख यांनी पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये, त्यांना मनसोक्त जीवन जगू द्या व उमळू देण्याचा सल्ला दिल. वैभव देशमुख यांनी बालविवाह मोठा ज्वलंत प्रश्न समाजा पुढे उभा आहे. उडान प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरणार असून, समाजाने देखील जागृत होण्याची गरज असल्याचे सांगितले. संदीप कुलकर्णी यांनी बालविवाह प्रतिबंधाच्या जनजागृतीसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परीने पत्रकारांचे सहकार्य राहणार असून, या समाजोपयोगी कार्यासाठी योगदान देण्याची ग्वाही दिली. ॲड. अनुराधा येवले यांनी मुलांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याकरिता स्नेहालय संस्थेच्या अंतर्गत उडान या स्वतंत्र प्रकल्पाची नव्याने संरचना करण्यात आली आहे. हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यासाठी बालविवाहास बळी पडणाऱ्या बालकांना शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि पुनर्वसन करण्यासाठी काम करेल. त्यातून अनेक बालकांचे जीवन सावरले जाणार आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सक्रिय अंमलबजावणी आणि बालविवाह विषयक जनजागृती करण्यासाठी सुद्धा हा प्रकल्पांतर्गत काम केले जाणार असल्याची माहिती हनिफ शेख यांनी दिली.
बालदिनाच्या कार्यक्रमात विनोद कराचीवाला व गायत्री कराचीवाला यांनी सादर केलेया जादूच्या प्रयोगाने विद्यार्थी हरकून गेले. तर विविध जादूच्या खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका शेळके-बोबडे यांनी केले. आभार प्रवीण कदम यांनी मानले.