प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची व्यवस्था संविधानामध्ये -प्रा. डॉ. अमन बगाडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची व्यवस्था संविधानामध्ये आहे. न्याय विकला गेला तर न्यायव्यवस्था गुलाम होईल. साम्राज्य किंवा राजेशाही केवळ एका व्यक्तीच्या हिताचा विचार करत असते. लोकशाहीत सर्वांच्या कल्याणाचा विचार होत असतो. यासाठी लोकमंडल, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व प्रसारमाध्यमे या चार स्तंभाची योजना आपल्या संविधानाने केली असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. अमन बगाडे यांनी केले.

शहरातील सीडी देशमुख लॉ कॉलेज येथे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम पदवी प्रदानप्रसंगी प्रा. डॉ. बगाडे बोलत होते. पुढे ते म्हणाले की, लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आपापली कर्तव्य अगदी निरपेक्ष भावनेने पार पाडली, तर सर्वसामान्यांचा हिताला वाव मिळून सर्व समाज घटकांना आपापले हक्क व अधिकार प्राप्त होतील. पण वरील चार स्तंभात कार्यरत असणारे प्रस्थापित व उपभोगते सर्वसामान्यांना त्यांचे हक्क अधिकार व न्याय प्राप्त होऊ देत नाहीत. परिणामी सर्वसामान्यांचा उत्कर्ष होत नाही. आता विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की, आपण कायद्याचा नीटनेटका अभ्यास करून देशातील व समाजातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व समन्यायाची समाज प्रस्थापनेच्या कार्यात विद्यार्थ्यांनी हातभार लावण्याचे आवाहन बगाडे यांनी केले.

कॉलेजचे सचिव प्रा.ना.म. साठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी विधीचा अभ्यास करणाऱ्या युवकांनी पुढाकार घेऊन आपले कर्तृत्व सिध्द करण्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य रियाज बेग यांनी कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षातील विद्यार्थी हर्षवर्धन गायकवाड यांनी केले. आभार प्रशांत खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका जबीन शेख, भाग्यश्री देवतरसे, प्राध्यापक सारंग गणबोटे, अण्णासाहेब थोरात, सविता तांबे, अमित भोसले, विशाल राठोड, सतीश थोरात, यमुना रासकर, रवींद्र कनगरे यांनी परिश्रम घेतले.