मानांकित खेळाडूंनी विजय मिळवून कायम राखले मानांकन; तर दुहेरीत मानांकन नसलेल्या खेळाडूंनी केला मानांकित खेळाडूंचा पराभव
राज्यातील बॅडमिंटन खेळाडू भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार -श्रीकांत वाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक अंतिम सामने शुक्रवारी (दि.12 जुलै) रंगतदार झाले.
अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये मानांकित खेळाडूंनी विजय मिळवून आपले मानांकन कायम राखले. तर 15 वर्षा आतील मुलांच्या दुहेरीत व 17 वर्षा आतील मिश्र दुहेरीत मानांकन नसलेल्या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव केला.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने व नगर बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत वाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, मयुर घाटणेकर, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, मुख्य पंच मिलिंद देशमुख, उप मुख्य पंच विश्वास देसवंडीकर, स्पर्धा नियंत्रक सचिन भारती, योनेक्स सनराइजचे रहेमत खान, राहुल मोटे, राजश्री कुलकर्णी, सुनिल कुलकर्णी, मल्हार कुलकर्णी, डॉ. मंजिरी कुलकर्णी, मृन्मयी कुलकर्णी आदींसह राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकांत वाड म्हणाले की, सलग दुसऱ्या वर्षी अहमदनगर शहरात महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा तेवढ्याच दिमाखात व उत्साहात पार पडली. याचे श्रेय प्रशिक्षक व खेळाडूंना जात आहे. राज्यातील खेळाडूंच्या खेळाचा दर्जा व फिटनेस उत्कृष्ट असून, हे खेळाडू भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. अशोक कोठारी म्हणाले की, विजेत्यांनी आणखी पुढचा टप्पा गाठावा व पराभव झालेल्यांनी पुन्हा प्रयत्न करून यश मिळवावे. बॅडमिंटन खेळ शहरात रुजले असल्याचे या स्पर्धेतून स्पष्ट होत आहे. अशा स्पर्धा भरवून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केल्याबद्दल कुलकर्णी परिवाराचे त्यांनी आभार मानले. गणेश भोसले यांनी खेळाडूंकडे पाहून एक वेगळी प्रसन्नता मिळते. खेळाने मन आनंदी व शरीर सुदृढ बनते. महापालिकेच्या माध्यमातून पुढे राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन स्पर्धा घेण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

पाहुण्यांचे स्वागत मल्हार कुलकर्णी यांनी केले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेणारे मिलिंद कुलकर्णी यांचा महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत वाड यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने सन्मान करण्यात आला.


बॅडमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक 15 वर्षा आतील मुलांच्या अंतिम सामन्यांमध्ये मानांकित खेळाडू सचित त्रिपाठी (पुणे) याने यश सिन्हा (ठाणे) याचा 20-22 21-15 21-13 पराभव केला. 15 वर्षा आतील मुलींच्या अंतिम सामन्यात यशस्वी पटेल (पुणे) या मानांकित खेळाडूने दर्शिता राजगुरु (नाशिक) हिचा 21-18 21-17 ने पराभव केला. 15 वर्षा आतील मुलांच्या दुहेरीत मानांकन नसलेले खेळाडू अभिक शर्मा व स्वरित सातपुते (पुणे) यांनी मानांकित खेळाडू उदयन देशमुख (औरंगाबाद) व सयाजी शेलार (पुणे) यांचा 21-17 19-21 21-13 ने पराभव केला. तसेच 17 वर्षा आतील मुलींच्या दुहेरीत मानांकन नसलेली प्रक्रिती शर्मा (रायगड) व रिधीमा सरपटे (नागपूर) या जोडीने मानांकित खेळाडू युतिका चौहान (पुणे) व निशिका गोखे (नागपूर) यांचा पराभव केला.
या स्पर्धेतील 17 वर्षा आतील मुलांचा विजयी संघ पालघर, उपविजयी ठाणे व 17 वर्षा आतील मुलींचा विजयी संघ रायगड, उपविजयी पुणे संघातील खेळाडूंना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते चषक व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तर यावेळी वैयक्तिक स्पर्धेतील विजयी व उपविजयी खेळाडूंना बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी योनेक्स सनराइज या कंपनीची मुख्य स्पॉन्सरशिप मिळाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.
17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील वैयक्तिक सामान्यातील विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे:-
15 वर्षा आतील मुली विजयी- यशवी पटेल (पुणे), उपविजयी- दर्शिता राजगुरु (नाशिक).
15 वर्षा आतील मुले विजयी- सचित त्रिपाठी (पुणे), उपविजयी- यश सिन्हा (ठाणे).
15 वर्षा आतील मुली दुहेरी विजयी- अनुष्का इपटे (रायगड), रुतिका कांबळे (कोल्हापूर), उपविजयी- शौर्या रांजणे (पुणे), सोयरा शेलार (पुणे).
15 वर्षा आतील मुले दुहेरी विजयी- अभिक शर्मा (पुणे), स्वरित सातपुते (पुणे), उपविजयी- उदयन देशमुख (औरंगाबाद), सयाजी शेलार (पुणे).
15 वर्षा आतील मिश्र दुहेरी विजयी- आयुष अडे (पुणे), शरायू रांजणे (पण्णे), उपविजयी- रुतिका कांबळे (कोल्हापूर), स्वरित सातपुते (पुणे).
17 वर्षा आतील मुली विजयी- शौर्या मडावी (नागपूर), उपविजयी- रिधिमा सरपटे (नागपूर).
17 वर्षा आतील मुले विजयी- अर्जुन रेड्डी (मुंबई उपनगर), उपविजयी- देव रुपारेलिया (पालघर).
17 वर्षा आतील मुली दुहेरी विजयी- प्रक्रिती शर्मा (रायगड), रिधिमा सरपटे (नागपूर), उपविजयी- निशिका गोखे (नागपूर), युतिका चौहान (पुणे).
17 वर्षा आतील मुले दुहेरी विजयी- अर्जुन बिराजदार (ठाणे), आर्यन बिराजदार (ठाणे), उपविजयी- निधीश मोरे (पालघर), सानिध्य एकाडे (ठाणे).
17 वर्षा आतील मिश्र दुहेरी विजयी- पार्थ देओरे (नाशिक), तन्वी घारपुरे (ठाणे), उपविजयी- प्रणय गाडेवार (नागपूर), निशिका गोखे (नागपूर).