निदर्शने करुन संविधान विरोधी सुरु असलेल्या कृत्याचा निषेध
मुस्लिम, ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लोकप्रतिनिधी मुस्लिम, ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजाला उद्देशून अपशब्द व आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. या सर्व प्रकरणाचा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना देण्यात आले. शुक्रवारी (दि.27 जून) दुपारी मोठ्या संख्येने मुस्लिम युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन संविधान विरोधी सुरु असलेल्या कृत्याचे जोरदार निषेध नोंदवला.
समाजात जातीय द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाबद्दल कधी हिरवे साप, कधी बांग्लादेशी, पाकिस्तानी म्हणून उद्देशून बोलले जात आहे. कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, त्यात जोपर्यंत मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला विरोधात काही आक्षेपार्ह बोलत नाही, तोपर्यंत त्यांचा दिवस सफल होत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
नुकतेच शनिशिंगणापूर येथे काम करणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला कामावरून काढून टाकण्यासाठी आंदोलन केले व तेथे काम करणाऱ्या सर्व मुस्लिम समाजाला जिहादी असल्याचे संबोधले. तसेच सोलापूर अक्कलकोट येथेही मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची दर्गा असो की मशीद त्याला तोडण्यासाठी व त्यावर कब्जे करण्यासाठी सतत प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. सत्ताधारी सांगेल ते कायदा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मुस्लिम असो की ख्रिश्चन सर्व अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजाच्या विरोधात सतत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह भाषण करून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ख्रिश्चन समाजाविरोधात मोर्चे काढण्यात आले, वंशाचा मुद्दा पुढे करून मुस्लिम समाजाविरोधात चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. नुकतेच जवखेडे खालसा येते हजरत रमजान बाबा दर्गा उर्फ कान्होबा येथे न्यायालयाचा मनाई हुकूम असताना मोठा जनसमुदाय आणून दर्गात आरती करण्यात आली. चिथावणी देणाऱ्या भाषणामुळे दर्ग्यावरील हिरवा झेंडा काढून तेथे भगवा झेंडा लावण्यात आला. हिरवी चादर काढून भगवी चादर टाकण्यात आली. हे सर्व कृत्य पोलीस प्रशासनाच्या मदतीने दर्ग्याची विटंबना करण्यात आल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला.
अशा कृत्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठी जातीय दंगल घडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम समाजा विरोधात भडकाऊ भाषण करणे, मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या मालकी जागांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई करण, मुस्लिम धार्मिक स्थळ आणि कब्रस्तान यांच्यावर कारवाई करण्याचे एकीकडे प्रशासनाला निवेदन देणे आणि दुसरीकडे एका विशिष्ट जातीच्या लोकांना व जातीयवादी संघटनेला मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्याचे आव्हान करणे. सदर प्रकार विधानसभा निवडणुकीनंतर सर्रास चालू आहे. ज्या प्रकारे नगर शहर विधानसभेचे आमदार अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, समाजाविरोधात काम करत आहे, त्यावरून असे दिसते की, हा देश भारतीय संविधानाने चालत असल्याचे आमदार विसरले असून, तुमच्या विचारधारेने चालत नाही. महायुतीचे आमदार संग्राम जगताप हे विकासाचे काम सोडून प्रत्येक मुस्लिम धार्मिक स्थळात मंदिर शोधण्याचे काम करत आहे. मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या मालकी जागांवर महानगरपालिका आयुक्तांना दर्गा व मजारे तोडण्यासाठी निवेदन देऊन, ते तोडले तर आम्ही तोडू अशी धमकी देण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे हे सगळे होत असताना जिल्हा अधिकारी असो व जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा महानगरपालिका आयुक्त हे नेहमीप्रमाणे कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई झालेली नाही. तरी सर्व बाबीपाहता संबंधित लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीची शपथ संविधानावर घेतली असल्याचे विसरले आहे. त्यामुळे संविधान विरोधी कृत्य करत आहे. संविधान विरोधी आणि अल्पसंख्यांक समाजविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.