खासदार विखे व आमदार जगताप यांचे आभार
भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास विकासाला चालना मिळणार -शिवम भंडारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरी सुविधांच्या अभावामुळे भिंगारचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागणी केल्याबद्दल व या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार संग्राम जगताप यांचे सामाजिक कार्यकर्ते शिवम भंडारी यांनी भिंगारकरांच्या वतीने आभार मानले आहे. तर भिंगारच्या छावणी परिषदेतून सुटका होऊन महापालिकेत समावेश होण्यासाठी भिंगारमध्ये राबविण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या मोहिमेचा दस्त खासदार विखे व आमदार जगताप यांना देण्यात आले असल्याची माहिती भंडारी यांनी दिली.
भिंगार छावणी परिषदेचा समावेश अहमदनगर महापालिकेत होण्यासाठी स्थानिक नागरिकांचे मत जाणून घेण्याकरिता एप्रिल मध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी भिंगारचे महापालिकेत समावेश होण्याबाबत सहमती दर्शवून स्वाक्षरी अभियानात सहभाग नोंदवला होता. 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भिंगारचे स्थानिक नागरिक, छावणी परिषदेचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्वाक्षऱ्यांची मोहिमेची माहिती भंडारी यांनी खासदार विखे व आमदार जगताप यांना दिली होती.
भिंगार छावणी परिषद विसर्जित करून अहमदनगर महापालिकेत भिंगार शहराचा समावेश होण्यासाठी सर्व भिंगारकरांची इच्छा असून, छावणी परिषद अस्तित्वात आल्यापासून 144 वर्षानंतर यामधून नागरिकांची सुटका होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अहमदनगर शहराचा विकास होत असताना भिंगार छावणीच्या चटई क्षेत्रामुळे विकास खुंटला आहे.
अनेक विकास कामे रेंगाळली जात आहे. नागरिकांना स्वत:ची जागा असताना चटई क्षेत्राच्या जाचक अटींमुळे इमारत बांधता येत नाही. रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईनच्या समस्या गंभीर असून, भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास हे प्रश्न सुटण्यास मदत व विकासाला चालना मिळणार असल्याचे शिवम भंडारी यांनी म्हंटले आहे.