भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी
मराठीच्या खुनाचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण असा शब्द बदल करून महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याचाच प्रयत्न केला जात आहे अनिवार्य च्या ऐवजी सर्वसाधारण असा शब्द बदल म्हणजे शब्दच्छल असून, फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या खूनाचा प्रयत्न सुरू केला आहे, अशा परखड शब्दात समाचार घेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिलने हिंदी भाषा लादण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली असल्याची माहिती भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ.ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून संस्कृतीचा भाग आहे. महाराष्ट्राच्या धमन्यांमध्ये मायबोली मराठीचा बाणा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ढोंग करायचे आणि पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हिन्दी सक्तीची करायची या दुटप्पी निर्णयातून भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पहिलीपासून पाचवीपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मराठी भाषा, महाराष्ट्राची अस्मिता व मराठी संस्कृतीवर हल्ला आहे. संयुक्त महाराष्ट्र आणि भाषावार प्रांतरचनेसाठी लढलेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही. रा.स्व. संघाचे जोशी यांचे मुंबईत मराठीत बोलण्याची गरज नाही हे विधान आणि हिंदी पहिली ते पाचवी सक्तीची हा फडणवीसांचा निर्णय हा मराठी विरोध! या एकाच दिशेने जात आहे. भाजपाला समर्थन देणाऱ्या मराठी माणसाला या निर्णयाने धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. भाजपा ही बहुजन हिंदूंची व मराठी माणसाची कधीही होऊ शकत नाही. महागाई, बेरोजगारीने होरपळणाऱ्या हिंदूंची काळजी भाजपाला नाही. हे देखील सर्वांच्या लक्षात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंदीसह सर्व भाषांबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आदर आहे. मराठीसह इतर अनेक भाषेत संवादाचा आम्ही आदर करतो. मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणे अयोग्य असून, हिंदी बाबत अनिवार्यच्या ऐवजी सर्वसाधारण असे शब्दप्रयोग करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करुन हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हंटले आहे.
भाजप हा द्वेष पसरवणारा पक्ष आहे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरूद्ध हिंदी वाद निर्माण करून मते मिळवण्यासाठी तुम्ही कितीही मराठीवर हल्ला केला तरी भाकपा मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या बाजूने ठामपणे उभी आहे. मराठी बद्दलचे बेगडी व बनावट प्रेम असणारे व त्यांच्या वर्चस्वाखाली राहणारे नकली, उथळ नेतृत्व या निमित्ताने उभे करून गोदी मिडियाद्वारे त्याला मोठे करण्याचेही फडणवीसांचे षडयंत्र असू शकते. यापासूनही जनतेने सावध रहावे. हिन्दी भाषेबद्दल द्वेष निर्माण करून अराजकता पसरवण्याचा देखील हा डाव आहे. विविध भाषा, संस्कृती, विविध खानपाण, विविध पेहराव, विविध सणवार राष्ट्रीय एकात्मतेने नटलेल्या भारत देशाचे तुकडे करण्याचा हा भाजपाचा डाव आहे! पहिली ते पाचवीच्या कोवळ्या मुलांवर राजकीय कुउद्देशाने प्रेरीत अशा प्रकारची सक्ती अवैज्ञानिक व बाल माणसशास्त्राच्या विरोधात असल्याचे भाकपच्या वतीने भूमिका मांडण्यात आली आहे.
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याचा आपला निर्णय या पार्श्वभूमीवर तातडीने मागे घ्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिल करत आहे. सरकारने महाराष्ट्रातील जनतेची भावना लक्षात घेऊन सक्ती मागे न घेतल्यास या विरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
