• Sat. Nov 1st, 2025

यापुढे नोटा देऊन वोटचा धंदा चालणार नाही -परमेश्‍वर गोणारे

ByMirror

May 10, 2024

बसपाचे उमेदवा यादव यांच्या प्रचारार्थ बोल्हेगावला बैठक

जिल्ह्यातील घराणेशाही व गुंडशाही हद्दपार करण्यासाठी बसपाची उमेदवारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दलितांवर अन्याय-अत्याचार सातत्याने सुरू आहेत. मात्र येथील प्रस्थापित नेते त्यावर भाष्य करत नाही. धनदांडगे नेते साखर कारखाने, शैक्षणिक संस्थांच्या बळावर सर्वसामान्यांना ताब्यात घेत आहे. नोकरदार, कामगार वर्गाची पिळवणूक सुरु आहे. सर्वसामान्य जनता शहाणी झाली असून, यापुढे नोटा देऊन वोटचा धंदा चालणार नसल्याची भावना बसपाचे प्रदेशाध्यक्ष परमेश्‍वर गोणारे यांनी व्यक्त केली.


बहुजन समाज पार्टीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ बोल्हेगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोणारे बोलत होते. याप्रसंगी भाऊसाहेब पुंजरवाड, उमेदवार उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, महिला जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा सचिव सुभाष साबळे, पारनेर विधानसभा प्रभारी बाळासाहेब मधे, अहमदनगर लोकसभा प्रभारी जितेंद्र साठे, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, बाळासाहेब काते, राहुरी शहराध्यक्ष रवि भालेराव, शेवगाव विधानसभा अध्यक्ष गौतम चव्हाण, मोहन काळे, अजित यादव, सुरज यादव, रवि यादव, गुड्डू वाघमारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे गोणारे म्हणाले की, भटक्या आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील स्वातंत्र्याची फळे मिळालेली नाहीत. शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जात नाही. त्यांच्या नावावर घरे नाहीत, सरकारी जागेवर पाल ठोकून ते राहत आहेत. मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी देखील त्यांना जागा दिलेली नाही. जिल्ह्यात मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाचे प्रश्‍न देखील गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकरी मालाची निर्यात बंदी करून शेतकरी वर्ग उध्वस्त केला असल्याचे ते म्हणाले.
सर्वसामान्य नागरिकांना एक चांगला, निष्कलंक व सर्वसामान्य वर्गाच्या प्रश्‍नांची जाणीव असलेला उमेदवार देऊन बहुजन समाज पार्टीने नागरिकांना पर्याय दिला आहे. बहन मायावतीजींच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन गोणारे यांनी केले.


भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन बैठकीला प्रारंभ करण्यात आला. उमाशंकर यादव म्हणाले की, सत्तेतून पैसा व पैश्‍यातून सत्ता मिळवणाऱ्या पुढाऱ्यांमुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. युवकांना रोजगार नाही, महिलांना संरक्षण नाही, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर दिवसाढवळ्या अन्याय-अत्याचार सुरु असताना याचा बिमोड नागरिकांना मतदानातून बदल घडवून करावा लागणार आहे. सर्वसामान्यांच्या हातात सत्ता आल्यास लोककल्याणकारी निर्णय होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ यांनी गुंडशाही व धनशक्तीच्या विरोधात बसपा निवडणुकीला सामोरे जात आहे. मतदारांनी चांगल्या उमेदवारास निवडून दिल्यास त्यांचे भवितव्य उज्वल राहणार असल्याचे स्पष्ट केले. शहानवाज शेख म्हणाले की, मुस्लिम ही कोणाचीही वोट बँक नाही.

समाजात शिक्षणाने जागृती निर्माण झाली असून, सत्ताधारी व विरोधकांची लबाडी देखील सर्वांना कळाली आहे. मुस्लिमांचे नावे घेऊन हिंदू बांधवांची माथी भडकावून समाजात द्वेष पसरविणारे व मुस्लिमांना विविध खोटे आश्‍वासने देणाऱ्यांना खतपाणी घातले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील घराणेशाही व गुंडशाही हद्दपार करण्यासाठी बसपाच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागणार असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *