सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बाबा बंगाल दर्गा व मस्जिद येथील जागेच्या दाव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा बंगाल दर्गा व मस्जिद वक्फ कमिटीच्या बाजूने निकाल दिला असून, सदर जागा मस्जिद वक्फ कमिटीची असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. मागील 8 वर्षापासून हा दावा न्यायप्रविष्ट होता, नुकतेच न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश व न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी हा निकाल दिला आहे.
बाबा बंगाल दर्गा व मस्जिद वक्फ कमिटी यांच्याविरुद्ध सय्यद हमीद अब्दुल लतीफ यांनी दर्गा व मस्जिदची असलेली 2.76 एकर क्षेत्र स्वत:च्या मालकीची असल्याचा दावा केला होता. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने सदर जागा दर्गा व मस्जिद कमिटीची असल्याचा निकाल दिला होता.
यावर सय्यद यांनी त्या निकालाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला. वादी-प्रतिवादी या दोघांचे म्हणणे ऐकून घेत व समोर पुरावे म्हणून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवत सदरची जागा ही बाबा बंगाल दर्गा व मस्जिद कमिटीची असल्याचा निकाल दिला आहे.
यासंदर्भात दर्गा व मस्जिद कमिटीच्या वतीने ॲड. विनय नवरे व ॲड. शशी भूषण आडगावकर यांनी काम पाहिले. हे प्रकरण चालविण्यासाठी ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त स्व. शेख सलाउद्दीन सैफुद्दीन, शेख अब्दुल गफ्फार कादर, शेख कादर समशोद्दीन, शेख सादिक बाबुलाल, शेख आरिफ अब्दुल रज्जाक विशेष योगदान दिले.