• Mon. Jun 8th, 2026

मोहरम उत्सवासाठी प्रशासनाने तातडीने पूर्वतयारी करावी; आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ByMirror

Jun 8, 2026

450 वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेच्या मोहरम उत्सवासाठी सुरक्षा, सुविधा आणि समन्वय बैठकीची मागणी


हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मोहरम उत्सवासाठी प्रशासनाकडे विविध मागण्या

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम (सवारी) उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या पूर्वतयारीबाबत आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. उत्सव काळात उद्भवणाऱ्या विविध समस्या, भाविकांच्या सुरक्षिततेचे प्रश्‍न तसेच प्रशासनाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांकडे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, फैरोज पठाण, दानिश शेख, सहारा सोशल क्लबचे अध्यक्ष अजीम राजे, शहाबाज शेख, साजिद जहागीरदार, अकबर अली शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते.


शहरात सुमारे 450 वर्षांहून अधिक काळाची मोहरम उत्सवाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. शहरातील मोहरम उत्सव हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. कोठला, सर्जेपुरा, हवेली, जुने शहर, कापड बाजार, दिल्लीगेट आदी भागांतून निघणाऱ्या सवाऱ्यांच्या दर्शनासाठी तसेच लंगर आणि सरबत वाटपच्या सेवांमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो भाविक शहरात दाखल होत असतात. या ऐतिहासिक आणि संवेदनशील उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे डांबरीकरण करून तातडीने बुजवावेत, अतिक्रमणे हटवावीत तसेच अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सवाऱ्यांच्या उंचीचा विचार करून मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. महावितरण विभागाने मिरवणूक मार्गांवरील खाली लोंबकळणाऱ्या उच्च व कमी दाबाच्या वीजतारा तातडीने उंच कराव्यात अथवा त्यांचे सुरक्षित इन्सुलेशन करावे, अशी मागणी करण्यात आली. उत्सवाच्या प्रमुख दिवशी अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच महानगरपालिकेने बंद पडलेले स्ट्रीट लाईट्‌स व हायमास्ट दिवे तातडीने कार्यान्वित करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.


भाविकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने कोठला मैदान, हवेली आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कार्डियाक ॲम्ब्युलन्स, डॉक्टरांचे प्रथमोपचार पथक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच अग्निशामक दलाच्या गाड्या संवेदनशील भागात तैनात कराव्यात आणि उघडे नाले व धोकादायक इमारतींच्या परिसरात बॅरिकेडिंग करावे, अशी मागणीही करण्यात आली.


कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुख्य मार्गांवर पोलीस, एसआरपीएफ आणि गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा. ड्रोन आणि सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे 24 तास नियंत्रण ठेवावे. महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक व साध्या वेशातील महिला पोलीस तैनात कराव्यात. सोशल मीडियावर अफवा पसरवून जातीय सलोखा बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर सायबर विभागाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि फिरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहतूक शहराबाहेरून वळवावी, स्पष्ट रूट डायव्हर्जन योजना जाहीर करावी आणि नो-पार्किंग झोन निश्‍चित करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.


शहराची गंगा-जमुनी संस्कृती, सामाजिक ऐक्य आणि सलोख्याची परंपरा जपण्यासाठी मुस्लिम समाज आणि सर्व सवारी मंडळे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. उत्सव सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महावितरण, आरोग्य विभाग आणि सवारी मंडळांची संयुक्त समन्वय बैठक आयोजित करून संबंधित विभागांना आवश्‍यक निर्देश देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

नगरचे मोहरम उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून शहराच्या गंगा-जमुनी संस्कृतीचा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत वारसा आहे. दरवर्षी लाखो भाविक या उत्सवात सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसह सर्व मूलभूत सुविधांची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि पोलीस बंदोबस्त याबाबत तातडीने उपाययोजना झाल्यास उत्सव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडेल. मुस्लिम समाज, शांतता समिती आणि सर्व सवारी मंडळे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध असून शहरातील सलोखा, बंधुता आणि ऐक्य कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. -साहेबान जहागीरदार (अध्यक्ष, आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *