आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन
राज्यभरातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती; “पावसाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा” या विषयावर होणार परिसंवाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे रविवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी स्व. शाहुराव देशमुख साहित्य नगरीत 16 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे आयोजन मराठी साहित्य मंडळ (ठाणे) या संस्थेच्या वतीने करण्यात आले असून, राज्यभरातील नामांकित साहित्यिक, कवी, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते या साहित्य महोत्सवात सहभागी होणार आहे. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी साहित्य मंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव देशमुख व तालुका प्रमुख पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.
संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ काम पाहत आहे. कार्यक्रम स्थळ म्हणून नगर-पुणे रोडवरील “स्नेहांकुर” येथे असलेली स्व. शाहुराव देशमुख साहित्यनगरी निवडण्यात आली आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर मराठी साहित्य मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहालय प्रमुख), ज्ञानदेव पांडुळे (रयत शिक्षण संस्था), प्राचार्य शिवाजीराव भोर, मेधाताई काळे, अनिल मोहिते, भूषण देशमुख, संजय बंदिष्टी, जयकुमार मुनोत, आनंद कटारिया, माजी नगरसेवक सुनिलमामा कोतकर, अमोल येवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या आयोजन समितीत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव (पुणे), राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. घनःशाम पांचाळ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विनायकराव जाधव, उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन धस, अनिताताई काळे, तालुकाध्यक्ष नानासाहेब डोंगरे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता स्वागतगीताने होईल. अनिताताई काळे यांनी लिहिलेल्या गीताने उद्घाटन सत्र रंगणार आहे. काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी डी. आर. बांगर (लोणार, बुलढाणा) आणि काव्यस्पर्धा प्रमुख राजेश थळकर (अलिबाग, रायगड) असतील. 30 मान्यवर कवींच्या कविता सादर होतील व त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.
प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ कवयित्री संगीता बढे (हिंगणघाट) उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात “पावसाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा” या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. बालाजी राजूरकर (बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट) असतील, तर प्रमुख वक्ते डॉ. संजय मेस्त्री (आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर, रत्नागिरी) असतील.
या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकभूषण पुरस्कार: डॉ. हेमंतकुमार अकोलकर (राजापूर), डॉ. निर्मला दरेकर (अहिल्यानगर), ग्रंथभूषण पुरस्कार: तृप्ती सुभाष आंब्रे (पिंपरी, पुणे), समाजभूषण पुरस्कार: लीना आढे, नानासाहेब डोंगरे, सरोज आल्हाट (अहिल्यानगर), विद्याभूषण पुरस्कार: अनिताताई काळे (अहिल्यानगर), साहित्यभूषण पुरस्कार: ओंकार कुचेकर (पुस्तक “सकारात्मक विचार आनंदाची रोपटी”), पद्मनाथ हिंगे (पुस्तक “शाल्मली”), व्यंकट पाटील (कादंबरी “कोब्रा”) यांचा समावेश आहे.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहालय संस्था) यांनी विनामूल्य हॉल व जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनात जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव देशमुख, उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन धस, अनिताताई काळे, सचिव बबनराव खामकर, तालुका प्रमुख नानासाहेब डोंगरे, आशाताई शिंदे, सलिमभाई आतार, भिमराव घोडके, सरोज आल्हाट, गिताराम नरोडे, हरिश्चंद्र दळवी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. संमेलनाचे निवेदन संदीप रासकर करणार आहेत.
आमदार संग्राम जगताप यांना विशेष निमंत्रण
संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजक मंडळाने आमदार संग्राम जगताप यांची विशेष भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. त्यांच्या हस्तेच या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून, मराठी साहित्याच्या परंपरेचा उत्सवमय सोहळा अहिल्यानगरात रंगणार आहे.
