जायंट्स ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदान करणारे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर समाज घडवणारे खरे मार्गदर्शक असतात, असे प्रतिपादन प्राचार्या आशा कवाने यांनी केले.
जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कवाने बोलत होत्या. या कार्यक्रमास जायंट्सचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, माजी अध्यक्षा नूतन गुगळे, पूजा पातूरकर, सचिव अमित मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे प्राचार्या कवाने म्हणाल्या की, शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर सामाजिक व कौटुंबिक समजही देते. विद्यार्थ्यांच्या भाषेनुसार आणि मानसिकतेनुसार विषय समजावून सांगणे ही खरी शिक्षकाची ओळख आहे. आज मानसिक आरोग्य ही गंभीर समस्या असून शिक्षकांनी मुलांना मानसिक आरोग्य आणि समस्यांशी लढण्याची तयारी करून द्यायला हवी, असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ. एन. जे. पाऊलबुध्दे एज्युकेशन संस्थेच्या प्राचार्या सौ. आशा दिवाकर कवाने, मोतीलाल कोठारी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अजितकुमार गुगळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमेश्वर (चांदा) येथील शिक्षक राहुल बोरा यांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
संजय गुगळे म्हणाले की, शिक्षण केवळ शैक्षणिक गुण आणि नोकरीपुरते मर्यादित न राहता समाज मजबूत करून देशाची प्रगती साधणारे असावे. जायंट्स ग्रुपकडून होत असलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन्मानित शिक्षकांनी जायंट्स ग्रुपच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक करुन, निस्वार्थपणे समाजात कार्य करणाऱ्या संस्थेकडून मिळालेला सन्मान हा अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.