शिक्षकांच्या सन्मानाला ठेच; वादग्रस्त परिपत्रक तात्काळ रद्द करावा -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर सोपविण्यात आल्याने शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकांच्या सन्मानाला व स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारे हे परिपत्रक तात्काळ रद्द करून संबंधितांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
या संदर्भातील सविस्तर निवेदन परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल तसेच शिक्षण आयुक्त यांना पाठवले असल्याची माहिती परिषदेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या या परिपत्रकाबाबत शिक्षक परिषदेनं तीव्र खेद व्यक्त केला आहे. समाज घडविण्याची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानाचा विचार न करता शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण व नियंत्रणाची जबाबदारी शिक्षकांवर टाकणे हे अन्यायकारक व अपमानास्पद असल्याचे शिक्षक परिषदेचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य व भवितव्य घडविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांवर सतत विविध शिक्षणबाह्य कामांचे ओझे लादले जात आहे. त्यामुळे शिक्षक मूळ अध्यापन कार्यापासून दूर जात असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासन व प्रशासनाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून शिक्षकांचा सन्मान व स्वाभिमान जपणे अत्यावश्यक आहे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहील, असा इशाराही शिक्षक परिषदेनं दिला आहे.
समाजहितासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने शिक्षकांचा सन्मान अबाधित ठेवणे गरजेचे असून शासनाने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे.
“शालाबाह्य कामांसाठी शिक्षकच का दिसतात ? भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असताना शिक्षकांनाच शिक्षणबाह्य व अशैक्षणिक कामांचा वाढता भार का व कशासाठी ? अशाच स्वरूपाच्या कामांमध्ये शिक्षकांचा वेळ जात असेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही का? हे प्रश्न उपस्थित करुन अशा जाचक व अन्यायकारक निर्णयाविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. शिक्षक परिषद या निर्णयाच्या विरोधात ठामपणे उभी राहिली आहे, असे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले.
