• Wed. Oct 15th, 2025

ताम्हणचे झाड प्रत्येक गावात आणि शाळेत पोहोचावे

ByMirror

Aug 4, 2025

जय हिंद फाऊंडेशनची राज्य सरकारकडे मागणी


राज्याच्या अधिकृत फुलाची ओळख वाढवण्यासाठी मोहिम

शासनाने सक्रिय सहभाग घेतल्यास ताम्हण हे फूल संपूर्ण महाराष्ट्रात बहरेल -शिवाजी पालवे

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे फुल म्हणून घोषित असलेल्या ताम्हणचे झाडांची रोपे प्रत्येक शालेय व गाव स्तरावरु मोफत वितरित करुन त्याची लागवड करण्याची मागणी जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ताम्हणच्या झाडांची लागवड सुरु करण्यात आली असून, राज्य सरकारने देखील हे झाडांची रोपे उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांनी दिली.


महाराष्ट्र सरकारनेच ताम्हणला राज्याचे अधिकृत फूल म्हणून मान्यता दिली आहे, तरीही अद्यापही विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या फुलाविषयी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे या फुलाची प्रत्यक्ष ओळख निर्माण व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने योगदान मिळावे, या उद्देशाने फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.


जय हिंद फाऊंडेशनने ताम्हणच्या रोपांची लागवड जिल्ह्यातील विविध भागात सुरु केली असून, यास व्यापक स्वरूप देण्यासाठी फाऊंडेशनने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे. राज्य सरकारने शाळा, ग्रामपंचायती आणि वनखात्याच्या माध्यमातून ताम्हण फुलाची रोपं मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


शिवाजी पालवे म्हणाले की, ताम्हण फुलाची झाडं सध्या फारच मर्यादित प्रमाणात आढळतात. त्याची संवर्धनाची निकड लक्षात घेता ही झाडं शालेय स्तरावर लावल्यास विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम जागवता येईल. एकाच वेळी संस्कृती, निसर्ग, पर्यावरण आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रतीकाची ओळख नागरिकांपर्यंत पोहोचेल.


जय हिंद फाऊंडेशनने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम, वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर ताम्हण फुलांची रोपं वितरित केली जात असून, शासनाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास हे फूल संपूर्ण महाराष्ट्रात बहरेल, असे मत पालवे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *