मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानची मागणी
शहरासह जिल्ह्यात सामाजिक सलोखा राहण्यासाठी पोलीसांनी त्वरित दखल घ्यावी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या जातीय तणावाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठान तर्फे सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि जातीय द्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांना निवेदन दिले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, तसेच मुजीर सय्यद, रोहन शेलार, फारुख सय्यद, गुल्लू सय्यद, बाबू शेख, अजमत इराणी, फारूक रंगरेज, आयान सय्यद आदी सदस्य उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही असामाजिक प्रवृत्ती शहरासह जिल्ह्यातील विविध घटनांचा गैरफायदा घेत समाजात जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देऊन लोकांमध्ये अविश्वास आणि भेदभाव निर्माण केला जात आहे. या प्रवृत्तीमुळे समाजातील सुशिक्षित युवकांना भावनिकरीत्या भडकवले जात असून, युवकांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्यास त्याचे भविष्य धोक्यात येत आहे. अशा घटनांनी सामाजिक अस्थिरता वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तींविरोधात तात्काळ आणि ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घटनांवर त्वरित दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. दोन्ही समाजांतील शांतता समिती सदस्यांना बोलावून परस्पर संवाद वाढवावा, सामाजिक ऐक्याचे संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करावेत आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शांतता आणि सौहार्द हवे आहेत, धार्मिक तणाव नव्हे
जातीय तणाव निर्माण करणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांवर तात्काळ पोलीसांनी दखल घ्यावी. जर कारवाईचा बडगा उगारला गेला नाही, तर समाजकंटक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून तणावाला खतपाणी घालत आहे. सामान्य जनतेला शांतता आणि सलोखा हवा आहे, राजकीय हेतूंसाठी समाजाचे ऐक्य बिघडवले जात आहे. परंतु नागरिकांनी अशा प्रवृत्तीपासून सावध व्हावे. -अल्ताफ सय्यद (अध्यक्ष, मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठान)