रिपाईचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र
अधिकारात नसताना स्वत:चे पती व इतर शिक्षकांच्या केल्या बदल्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकार कक्षेत नसताना स्वत:चे पती व इतर शिक्षकांच्या तोंडी बदल्या करुन पदाचा दुरुपयोग करणाऱ्या कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे स्मरण पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यस उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रिपाई ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, संतोष पाडळे, दानिश शेख, विनीत पाडळे, विकास पटेकर आदी उपस्थित होते.
कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी अधिकारात नसताना स्वतःचे पती व इतर शिक्षकांच्या बदल्या स्वत:च्या लाभापोटी केलेल्या आहेत. त्यांनी वर्तणुक नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची व बदली लाभ घेतलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांची वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत चौकशी होणे गरजेचे असल्याचे रिपाईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कारवाईची चाहूल लागताच प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी अधिकारात बदल्या केलेले स्वतःचे पती व इतरांना त्यांचे मूळ शाळेवर पाठवले आहे. याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता असून, तातडीने कारवाई करण्याचे म्हंटले आहे.
अकोले येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी देखील अशाच पध्दतीने तोंडी बदल्या केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. याच धर्तीवर कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या शिष्टमंडळाने केली आहे.