• Sat. Jan 31st, 2026

आष्टी-नगर-पुणे रेल्वे सुरु होण्यासाठी 19 ऑक्टोबरला अहमदनगर रेल्वे स्थानकावर सूर्यनामा

ByMirror

Oct 9, 2024

भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस नामकरणाचा प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइन यांच्या पुढाकाराने शनिवार दि.19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अहमदनगर रेल्वे स्थानकावर वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस या आष्टी-नगर-पुणे रेल्वे गाडीचा तमाम जनतेच्या वतीने सूर्यनामा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सब्बन व ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


जनतेच्या वतीने या गाडीचे नामकरण वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस करण्याचा निर्णय संघटनांनी घोषित केला असून, या आंदोलनात स्वयंसेवी संघटना आणि समविचारी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रेल्वेसेवेमुळे मराठवाडा पश्‍चिम महाराष्ट्राला जोडला जाणार असून, मराठवाड्या मधील विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुण्याच्या शैक्षणिक, औद्योगिक व व्यावसायिक सुविधांचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळू शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


नगर-परळी रेल्वे मार्ग गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ रखडला आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पोळी भाजण्यासाठी या रेल्वे मार्गाचा उदो-उदो केला जातो. आष्टी-जामखेड-बीड-परळी हा शेकडो वर्षे आर्थिक दृष्ट्या मागासलेला भाग आहे. या भागामध्ये अनेकांचा शेती व्यवसाय हा पोटपाण्याचा आणि मुख्य व्यवसाय असल्यामुळे आणि शेती अवर्षण प्रवण भागात मोडत असल्यामुळे या भागातील तमाम जनता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या दुबळी राहिली आहे. बीड जिल्हा पुणे सारख्या प्रगत भागाला आणि संपूर्ण देशातील शहरांना जोडला गेला तर त्यातून क्रांती होऊ शकेल, म्हणून अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाला विशेष महत्त्व असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.


नगर-आष्टी रेल्वे मार्ग बांधण्यात आला आणि डिझेल आणि विजेवर चालणारी शक्तिमान डेमु गाडीची सुरुवात देखील करण्यात आली. परंतु प्रवासी कमी पडल्यामुळे गाडी तोट्यात आली आणि रेल्वे स्टेशनवर ही गाडी कायमची थांबविण्यात आली आहे. त्यातून दर दिवसाला 5 ते 10 लाख रुपये या गाडीवर खर्च होतो. यातून मार्ग निघावा म्हणून भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईनने आष्टी-नगर-पुणे अशी शटल सर्व्हिस गाडी सुरू करावी, ज्यामुळे ही डेमु गाडी देशातील इतर रेल्वे गाड्यांपेक्षा नफ्यात राहील. अहमदनगर वरून पुण्याला जाण्यासाठी साडेचार तास लागतात कारण रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असते. त्यामुळे डिझेल पेट्रोलसह वेळेचे फार नुकसान होते. पुणे-नगर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. नगरचे आमदार, खासदार यांना या संदर्भात कधी वेळ मिळाला नाही. कारण त्यांचा डोळा सत्तेवर सातत्याने राहिला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


संघटनांनी सातत्याने गेली अनेक वर्षे या रेल्वेची मागणी करूनही रेल्वेचे अधिकारी व मंत्र्यांवर काही एक परिणाम झाला नाही. एकंदरीत रेल्वे खाते म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील लोकमकात्या झाल्याची प्रचिती जनतेला येत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांना नोटीस पाठवून हे आंदोलन जारी करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी रईस शेख, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, संदीप पवार, वीर बहादूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, बबलू खोसला, ओम कदम, कैलास पठारे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *