सत्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या शपथेवर आधारित लोकभक्तीने लोकशाही घडविण्याचे आवाहन
निस्वार्थ आणि जबाबदार नेतृत्व घडविण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका पारदर्शक आणि लोकशाही पध्दतीने होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्येक उमेदवाराने लोकभज्ञाक घोषणा मतदारांसमोर सादर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
ही घोषणा आकाशातील सूर्याला साक्ष ठेवून म्हणजेच सत्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या शपथेवर आधारित असेल. या घोषणेद्वारे उमेदवार आपल्या आचरणातील प्रामाणिकता, सामाजिक बांधिलकी आणि भ्रष्टाचारमुक्त लोकसेवेची प्रतिज्ञा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या घोषणेत नमूद करण्यात आले आहे की, जो उमेदवार मतदारांपासून दूर राहतो, जनतेशी थेट संवाद साधण्यास घाबरतो किंवा प्रचारात लाजाळूपणा दाखवतो, अशा उमेदवाराची जामीनरक्कम जप्त व्हावी. या मागील उद्देश असा की, लोकशाही ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून जनतेशी जिव्हाळ्याने जोडलेली भावना आहे. लोकप्रतिनिधी हा केवळ सत्ताधारी नव्हे, तर लोकांचा सेवक, मार्गदर्शक आणि विश्वासू साथीदार असावा, असे या उपक्रमाचे तत्त्वज्ञान असल्याचे म्हंटले आहे.
लोकभज्ञाक घोषणा पाच प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे. (लोकमकात्या चा त्याग) मी कधीही समाजहित, पर्यावरण आणि लोकांच्या सुखदुःखांपासून दूर राहिलो नाही. (भ्रष्टाचाराचा निषेध) मी कधीही दलाली, लाचखोरी किंवा सत्तेचा गैरवापर केलेला नाही. (लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती) माझे जीवन लोकसेवेच्या त्रिवेणी तत्त्वावर आधारित आहे. (पारदर्शक जबाबदारी) माझ्या सार्वजनिक कार्याचा पुरावा मी सूर्यसाक्षी ,मतदारांसमोर मांडेन. (जनसंवादाचे बंधन) जो जनतेपासून दुरावतो, तो लोकसेवक नव्हे; लोकशाही ही संवादातूनच जिवंत राहते. या तत्त्वांचा यामध्ये समावेश आहे.
लोकभज्ञाकशाही या नव्या लोकशाही संकल्पनेचा उल्लेख आहे. लोकभज्ञाकशाही म्हणजे लोकभक्तीने प्रेरित लोकशाही, ज्ञानभक्तीने प्रकाशित लोकशाही, आणि कर्मभक्तीने सिद्ध झालेली लोकशाही. ही तत्त्वे लोकशाहीला नव्या नैतिकतेकडे नेणारी आहेत, जिथे सत्तेचा हेतू स्वतःचा लाभ नव्हे, तर समाजाचा विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण असतो. सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, तसाच प्रत्येक लोकप्रतिनिधीने सर्व नागरिकांना समान न्याय, समान सेवा आणि समान आदर द्यावा. ही घोषणा केवळ निवडणूक शपथ नाही, तर समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची सूर्यसाक्षी लोकसेवा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या घोषणेद्वारे उमेदवारांना केवळ मत मागण्याचा अधिकार नव्हे, तर विश्वास मिळविण्याची जबाबदारी दिली आहे. समाजातील पारदर्शक, निस्वार्थ आणि जबाबदार नेतृत्व घडविण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरत आहे. जय लोकभज्ञाकशाही, जय किसान, जय निसर्गपाल! संपूर्ण महाराष्ट्रभर ही घोषणा लोकशाहीचा नवीन मार्गदर्शक ठरेल. सूर्याला साक्ष ठेवून दिलेली ही लोकसेवेची शपथ, सूर्यसाक्षी लोकशाही अखंड राहो! हाच संदेश देत असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले आहे.
