चर्मकार विकास संघाच्या पाठपुराव्याला यश; शहरात अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल चर्मकार विकास संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, नितीन उदमले, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सिसोदे, वधु-वर समितीचे खजिनदार अरुण गाडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा शहराध्यक्ष विनोद कांबळे, युवा गटई आघाडी जिल्हाध्यक्ष रुपेश लोखंडे आदी उपस्थित होते.
चर्मकार विकास संघाच्या वतीने सातत्याने शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न उपस्थित करुन पोलीस प्रशासनाकडे शहरातून अवजड वाहतुक बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शहरातील अवजड वाहतूक बंद होण्यासाठी उपाययोजना सुरु केल्याने त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.
शहरात रस्त्याचे कामे सुरु असल्याने पर्यायी मोजके रस्ते वाहतुकीसाठी नागरिकांना वापरावे लागत आहे. तसेच शाळा, महाविद्यालय सुरु झाल्याने त्यामध्ये अवजड वाहने शहरात आल्यास वाहतुक कोंडी व मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यापूर्वी देखील अवजड वाहनांमुळे अनेक अपघात घडले आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी अवजड वाहने शहराच्या बाहेरुन वळविण्याचे उत्तमप्रकारे नियोजन केल्याने काही प्रमाणात हा प्रश्न सुटला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शहरातील चौकात विशेष करून डीएसपी चौकात लहान मुले घेऊन महिला भिक मागणे, सिग्नल सुरू झाल्यानंतर सुद्धा वाहनाच्या पाठीमागे धावून बळजबरीने भीक घेणे, वस्तू विक्री करणाऱ्यांची असलेली वर्दळ असल्याने यामुळे देखील मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात देखील उपाययोजना करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या प्रश्नावर देखील जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.