बँकिंग क्षेत्रातीक उत्कृष्ट कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उरळी कांचन (जि.पुणे) येथील पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्डने गौरविण्यात आले.
येरवडा (जि. पुणे) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे डॉ. रविंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्राच्या सहकार्याने पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविंद्र भोळे यांच्या हस्ते सोनावणे यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी यतिन ढाके, सतीश गवळी, विद्याधर गायकवाड, पोपटराव भोळे, धन्यकुमार जैन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सोनावणे हे जिल्हा सहकारी बँकेत अनेक वर्षापासून कार्यरत असून, सध्या ते मेहेकरी (ता.नगर) शाखेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व मुंबई, नांदेड, भोपाळ, हैदराबाद येथे बँकेच्या माध्यमातून दिलेल्या सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनावणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
