• Wed. Jul 2nd, 2025

सुभाष आल्हाट यांची शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

ByMirror

Jun 13, 2025

दक्षिणेतील ग्रामीण भागात शिवसेनेचा संपर्क अभियान राबविणार -आल्हाट

नगर (प्रतिनिधी)- बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष आल्हाट यांची शिवसेना (शिंदे गट) अनुसूचित जाती विभागाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते व शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघमारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या पाठीशी बहुजन समाजाची ताकद एकत्र आणण्याची जबाबदारी आल्हाट यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बहुजन चळवळीत गेल्या 25 वर्षापासून सक्रीय असलेले आल्हाट यांचा अनुभव आणि समाजातील संपर्क महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना प्रदेशाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केली.


निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिणेतील ग्रामीण भागात संपर्क अभियान राबवून पक्षाशी समाजबांधव जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच शहरातील पदाधिकारी नियुक्ती व पक्ष संघटनसाठी नियोजित दौरे सुरू केले जाणार असल्याचे सुभाष आल्हाट यांनी सांगितले.


सुभाष आल्हाट बहुजन चळवळीत 25 वर्षापासून कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आंदोलन, उपोषण करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या सामाजिक व चळवळीतील कार्याची दखल घेऊन त्यांची शिवसेना (शिंदे गट) अनुसूचित जाती विभागाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, अतुल आखाडे, सागर पाटोळे, गणेश भिंगारदिवे, ऑगस्टीन आल्हाट, अजय साळवे, प्रकाश जाधव, अनिल प्रभुणे, विलास कांबळे, अविनाश घंघाळे, सोमनाथ सकट, नागनाथ साळवे, हरीश प्रभुणे, प्रकाश गायकवाड, अविनाश संसारे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *