नवनाथ विद्यालय व हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान
विघटन न होणारा प्लास्टिकचा कचरा सर्वात धोकादायक -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालय व हुतात्मा स्मारक परिसरात माय भारत उपक्रमातंर्गत नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेची व प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली.

या उपक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, बाळासाहेब कोतकर, मंदा साळवे, अमोल वाबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, भानुदास लंगोटे, साई श्रध्दा फाऊंडेशनच्या अर्चना परकाळे, प्रमोद थिटे, राम जाधव, भाऊ जाधव, किरण ठाणगे, अतुल फलके, अब्दुल शेख, बन्सी शेख, शिवाजी पुंड, विजय भगत, दिनेश भुसारे, अमोल भुसारे, मच्छिंद्र जाधव, विजय गायकवाड, छगन भगत आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, विघटन न होणारा प्लास्टिकचा कचरा सर्वात धोकादायक बनत चालला आहे. इतर कचऱ्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लावणे अवघड असून, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामाबद्दल जागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छतेसाठी घेतलेला पुढाकार हा रोगराई मुक्तीकडे वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व ग्रामस्थांना अस्वच्छता व प्लास्टिक कचऱ्याचे धोके सांगण्यात आले. उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागृक राहण्याचे, घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देणार नाही आणि आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची व प्लास्टिक मुक्ततेची शपथ घेतली. या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.