सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागाचा उपक्रम; विज्ञान, कला व इतिहासाचे आकर्षक प्रदर्शन
केवळ गुगलवर अवलंबून राहून खरा विद्यार्थी घडणार नाही -मुस्कान तलरेजा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जीनियस गॅलरी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कला, भाषा – इंग्लिश, मराठी, हिंदी,गणित-विज्ञान, भूगोल-पर्यावरण आणि ऐतिहासिक वास्तूंच्या मॉडेल्सचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांमुळे शाळेचा परिसर सर्जनशीलता आणि नवोपक्रमाच्या वातावरणाने भारावून गेला.
या जीनियस गॅलरीचा शुभारंभ मुस्कान तलरेजा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुरेश हिरानंदानी, महेश मध्यान, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन पापडेजा, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता तांबे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलताना मुख्याध्यापिका कांचन पापडेजा म्हणाल्या की, जीनियस गॅलरी हे केवळ प्रकल्पांचे प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, कुतूहलाचा आणि शिक्षणाचा एक उत्सव आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा हा उपक्रम असून, विद्यार्थ्यांच्या समग्र विकासावर शाळेचा भर आहे. अनुभवात्मक शिक्षण, समीक्षात्मक विचारसरणी, नवोपक्रम आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून दिसून येतो.
त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, सामाजिक अभ्यास, पर्यावरण जागरूकता आणि कला अशा विविध विषयांवर मॉडेल्स, प्रयोग आणि सर्जनशील प्रकल्प तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान मिळवले नाही, तर टीमवर्क, समस्या सोडविण्याची क्षमता आणि वर्गातील शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग कसा करावा हेही शिकवले जात असल्याचे स्पष्ट केले.
मुस्कान तलरेजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ गुगलवर अवलंबून राहून खरा विद्यार्थी घडत नाही. विद्यार्थ्यांमध्ये गुगलपेक्षाही वेगवान बुद्धिमत्ता आहे, ती जागृत करण्याची गरज आहे. फक्त इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्याच्या शर्यतीत धावण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःतील क्षमता ओळखून त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. वेगळ्या कल्पनाशक्तीला चालना देऊन स्वतःचा वेगळेपणा सिद्ध करण्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
गणित-विज्ञान व भूगोल-पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करून आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्याची झलक दाखवली. विद्यार्थ्यांनी कागदावर कुंचल्यातून साकारलेली चित्रे जिवंत भासत होती. तसेच गड-किल्ले, मंदिरे आणि विविध ऐतिहासिक वास्तूंची मॉडेल्सही तयार करण्यात आली होती.
प्रदर्शनात ज्वालामुखी, शहरातील प्रदूषणमुक्ती, वाहतूक कोंडीवरील उपाय, निसर्ग चक्र, ग्रहांची स्थिती, तारांगण, पाणी बचत, डीएनए मॉडेल, परमाणू संरचना, विद्युत लिफ्ट यांसारख्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी मॉडेल्सद्वारे सादर केले. याशिवाय नैसर्गिक शेती आणि पर्यावरणपूरक शहरांच्या संकल्पनांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून मोबाईलपासून दूर राहून सर्जनशील छंद कसे जोपासता येतात याचेही उत्तम उदाहरण या प्रदर्शनातून दिले. आकर्षक हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरल्या. या प्रदर्शनाला शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलाकृती व प्रकल्प साकारण्यासाठी परिश्रम घेतले होते.
जीनियस गॅलरी या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सचिव गोपाल भागवानी, खजिनदार दामोधर माखिजा तसेच विश्वस्त राजकुमार गुरुनानी आणि हरेष मध्यान यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनन शिरवानी आणि गुंजन पंजवानी यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नम्रता कुकरेजा, प्रीती कटारिया, करिष्मा नवलानी, अश्विनी देशपांडे, भावना ढाले, पुजा चोपडा, चांदणी सोनग्रा, प्रियंका चारगुंडी, करिष्मा शेख, अमरिंदरकौर ग्रेवाल, अनामिका म्हस्के, नयन तुपे, शुभांगी क्षीरसागर, शुभांगी दादासाहेब पाखरे आणि मेधा कुलकर्णी पठारे बाबासाहेब व प्रोग्राम कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले.
