हवेत उडणारे चमकीचे रंगेबिरंगी कागद व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी एकच धमाल
डोरेमॉनने केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावले
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.15 जून) कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे आगमन झाले. विद्यार्थ्यांच्या स्वागताला डोरेमॉन कार्टून उभे होते. पेपर ब्लास्टर हवेत उडणारे चमकीचे रंगेबिरंगी कागद व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी एकच धमाल आणि जल्लोष केला. तर कोल्ड फायरने आतषबाजी करण्यात आली.

प्रारंभी मुलांचे औक्षण करुन विद्यार्थांना गुलाबपुष्प देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत फुग्यांचे कमान उभारुन विविध कार्टुनचे कटआऊट लावण्यात आले होते.शाळेत एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी पहिला दिवस उत्साहात साजरा केला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अंबादास गारुडकर, माजी प्राचार्य विश्वासराव काळे, श्यामराव व्यवहारे, कैलास मोहिते, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सम्रग शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे व गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले.

अभिषेक कळमकर म्हणाले की, शाळेच्या उत्तम गुणवत्तेने मुले सर्वसामान्यांची मुले घडत आहे. शिक्षक तळमळीने शिकवत असून, गुणवत्तेबाबत शाळेने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी शाळेत राबविण्यात येणारी प्रत्यक्ष अध्ययन पध्दती, हसत-खेळत अद्यावत शिक्षण सर्वोत्तम ठरत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले.
