नवे विद्यार्थी नेतृत्व पदावर
नेतृत्व ही जबाबदारी – ॲड. गौरव मिरीकर
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या कालावधीसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वरद संतोष लोखंडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून श्रावणी मकरंद देशमुख, तर सहाय्यक विद्यार्थी प्रतिनिधी संचित विजय बारसे आणि सहाय्यक विद्यार्थिनी प्रतिनिधी समृद्धी शरद नमन यांची नियुक्ती करण्यात आली.
अशोकभाऊ फिरोदिया सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त ॲड. गौरव मिरीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राधिका मिरीकर, संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया तसेच सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे दिवंगत प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया आणि स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
शिक्षिका भारती हिंगे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विशाल आहेर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. शिल्पा कळमकर यांनी निवड प्रक्रिया व विद्यार्थी प्रतिनिधींच्या कर्तव्याविषयी माहिती दिली. मनीषा कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या ध्येयधोरणांविषयी तसेच विशेष आवड-छंद जोपासण्याबद्दल माहिती दिली. या निमित्ताने निवड झालेल्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते शोल्डर पिन, लाईन यार्ड व नेमप्लेट प्रदान करण्यात आल्या.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. गौरव मिरीकर म्हणाले, नेतृत्व ही केवळ एक पदवी नसून, ती एक जबाबदारी आहे. युवकांनी ठाम ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास नक्कीच स्वप्न पूर्ण होतात. जो बदल आपण समाजात अपेक्षित करतो तो सर्वप्रथम स्वतःमध्ये घडवणे आवश्यक आहे. अधिकार नेहमी जबाबदाऱ्यांमधूनच उदयास येतात. सामंजस्य, समन्वय आणि प्रामाणिकता हे नेतृत्वाचे मुख्य आधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी शिक्षक वर्गाचे कौतुक केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती या सोहळ्याला लाभली. कार्यक्रमाचे आभार सोनल शर्मा यांनी मानले.
