‘एक तरी कथा अनुभवावी’ या पहिल्या श्री समर्थ कथेचे सावेडीत आयोजन
संस्कारांची शिदोरी देणाऱ्या समर्थ विचारांचा नगरकरांना लाभ घेण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधुनिकतेच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात तंत्रज्ञान आणि बाजारपेठ वेगाने विस्तारत असताना मानवी जीवनातील मूल्ये आणि संस्कार हरवत चालल्याची खंत व्यक्त करत, “बाजारात सर्व काही मिळेल; मात्र संस्कार विकत मिळत नाहीत. हे संस्कार रुजविण्यासाठी राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांचे विचार आजच्या काळात अधिक महत्त्वाचे आहेत. नव्या पिढीमध्ये मूल्यांची पेरणी करून समर्थ, सक्षम व राष्ट्रनिर्मितीस हातभार लावणारा नागरिक घडविण्याचा संकल्प या समर्थ कथा सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या वर्षातील राष्ट्रनिर्माणाच्या आरंभासाठी समर्थ भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन समर्थभक्त श्री अजेय बुवा रामदासी महाराज यांनी केले आहे.
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस् यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘एक तरी कथा अनुभवावी’ या पहिल्या श्री समर्थ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा दि. 2 जानेवारी रोजी सायं. 5 वाजता तसेच दि. 3 व 4 जानेवारी रोजी सायं. 4 वाजता होणार आहे.
या कथा सोहळ्यात कथाकार अजेय बुवा रामदासी महाराज यांच्या रसाळ वाणीतील, भावस्पर्शी आणि सुश्राव्य प्रवचनातून श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनातील प्रसंग, विचारधारा, राष्ट्रभक्ती, समाजप्रबोधन व चरित्रवैशिष्ट्ये उपस्थित साधकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या कथेमुळे श्रोत्यांना समर्थ विचारांची आगळीवेगळी अनुभूती मिळणार असून, जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार रुजविण्याचे कार्य या माध्यमातून घडणार आहे.
या तीन दिवसीय समर्थ कथा सोहळ्याचा लाभ अधिकाधिक समर्थभक्त, शिक्षक, पालक, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ कथा सोहळा समितीचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले आहे. नगरकरांसाठी ही कथा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आत्मिक समाधान, संस्कारांची शिदोरी आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प घेण्याची एक महत्त्वाची संधी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
