• Fri. Sep 19th, 2025

जीवावर बेतणारी रात्रीची शहरातील अवजड वाहतूक थांबवा

ByMirror

Jan 6, 2024

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

पोलीस प्रशासनाने पुन्हा एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये -इंजि. केतन क्षीरसागर

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रश्‍नी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, किरण घुले, मंगेश शिंदे, ऋषीकेश जगताप, ओंकार मिसाळ, कृष्णा शेळके, कुणाल ससाणे, ओंकार साळवे, आशुतोष पाणमाळकर, केतन ढवन, तन्वीर मणियार, शिवम कराळे आदी उपस्थित होते.


अनेक दिवसांपासून रात्री शहरातील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वास्तविक पाहता अवजड वाहनांसाठी पर्यायी बाह्यवळ रस्त्याची व्यवस्था उपलब्ध असूनही अवजड वाहने शहरात घुसत आहे. यामुळे शहरात रात्रीची वाहतूक कोंडी वाढली असून, अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला यांना रात्रीच्या वेळी वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा होत चालली आहे. अवजड वाहनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे राष्ट्रवादी युवकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


या प्रश्‍नावर पोलीस प्रशासनाला वारंवार कल्पना देऊन देखील त्यावर ठोस पद्धतीने उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील पोलीस प्रशासन व वाहतूक प्रशासन या महत्त्वाच्या समस्येबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हंटले आहे. शहरातून होणारी अवजड वाहतुक येत्या दोन दिवसात बंद न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसह रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकच्या वतीने देण्यात आला आहे.



रात्री शहरातून होणारी अवजड वाहतुक नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. अवजड वाहनांमुळे यापूर्वी देखील अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या अवजड वाहन शहरातील नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असून, पोलीस प्रशासनाने पुन्हा एखाद्याचा जीव जाण्याची वाट न पाहता अवजड वाहतुक त्वरीत बंद करावी. -इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *