राज्य परिवहन महामंडळाशी मुंबईत सकारात्मक चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी व पेन्शन वाढसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन मुंबईत झालेल्या बैठकीच्या चर्चेनंतर तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी दिली.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आपल्या अनिर्णित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) आत्मक्लेश आंदोलन पुकारले होते. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी या आंदोलनाची तातडीने दखल घेत सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर राज्यभरात सेवानिवृत्तांचे होणारे आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचे सरचिटणीस सदानंद विचारे यांनी सर्व जिल्हा पातळीवरील संघटनांच्या प्रतिनिधींना कळविले आहे.
ईपीएस 95 बाबत योग्य तो निर्णय महामंडळस्तरावर घेतला जाईल, कामगार करारात मंजुर झालेल्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती महामंडळाने करावी याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत तपासुन निर्णय घेण्यात येईल, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत पास मिळावा व सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये चालावा याबाबत फेर टिप्पणी सादर करण्याचे आदेश कुसेकर मुख्य कामगार अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्याने वर्षभरासाठी पास मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोफत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व रजेच्या रोखी करणाचे पैसे एक रकमी देण्यात यावेत. सदर पैसे अजूनही दिलेले नाहीत, हा भार अंदाजे 300 कोटी रुपयांचा आहे. याबाबत तातडीने अहवाल मागवून निर्णय घेतला जाईल. नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच 2020 पासून नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यादरम्यान निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढलेल्या वेतनश्रेणी, महागाई भत्ता, घरभाडे जी काही फरकाची रक्कम होईल ती एक रकमी मिळावी या बाबत महामंडळ सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महामंडळाने संघटनेच्या प्रतिनिधींशी आशादायी चर्चा केल्यामुळे सोमवारी होणारे राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे होणारे आत्मक्लेश आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
