राज्यभरातून संघांचा सहभाग
विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे वळावे -डॉ. महानंदजी माने
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व कृषी विद्यापीठच्या (ता. राहुरी) मैदानावर वरिष्ठ वयोगटातील पुरुष व महिला यांच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाले. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. राज्यभरातून विविध संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंदजी माने यांच्या हस्ते झाले. यावेळी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या सचिव मीनाक्षी गिरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, महेश मिश्रा, संदीप पाटील, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे खजिनदार धनश्री गिरी, घन:श्याम सानप आदी उपस्थित होते.
डॉ. महानंदजी माने म्हणाले की, खेळामुळे आरोग्य उत्तम राहून मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. खेळाने एकाग्रता वाढत असून, विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
22 ते 24 एप्रिल दरम्यान पुरुष व महिला यांच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा रंगणार आहेत. वरिष्ठ गटातील स्पर्धेसाठी राज्यातून सोळा संघ सहभागी झाले असून, मुलींचे 8 संघ सहभागी आहेत. यामध्ये 300 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, नाशिक, अहमदनगर, सांगली, बीड, हिंगोली, जालना, बुलढाणा, लातूर आदी जिल्ह्यातील संघांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घन:श्याम सानप यांनी केले. आभार सोहम गिरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभिजीत गावडे, शैलेश परदेशी, हितेश बोंबले, संतोष जाधव, हलीम शेख आदी परिश्रम घेत आहे.
