रविवारी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा
सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व संस्थांचा होणार सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सावित्री-ज्योती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे राज्यस्तरीय सावित्रीज्योती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची दखल घेत यावर्षी डॉ. सुनिता पोटे (शिरूर), महेश कदम (रत्नागिरी), मिनाज शेख (पुणे), अमोल काटे (पुणे), सेंट सेव्हिअर्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज (अहिल्यानगर) तसेच प्रा. डॉ. अश्विनी वठारकर (पुणे) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
रविवारी दि. 18 जानेवारी रोजी गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून, आमदार संग्राम जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे, नोटरी पब्लिक ॲड. प्रशांत साळुंके, जिल्हा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. शिवाजी सांगळे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, डॉ. इसाभाई शेख, मेजर भीमराव उल्हारे, प्रा. सुनील मतकर, मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सेमी पैठणी साडी, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
डॉ. सुनिता पोटे (शिरूर) या गेल्या 25 वर्षांपासून आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत. राही फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोफत प्रसूती सेवा, किशोरवयीन मुलींची तपासणी, आदिवासी व मागास प्रवर्गातील महिलांची आरोग्य तपासणी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा तसेच सामाजिक प्रबोधनपर चित्रपट निर्मिती यांसारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.
महेश कदम (रत्नागिरी) हे माहिती अधिकारी, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेचे जिल्हा निरीक्षक असून महाराष्ट्र रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत. कोरोना काळात त्यांनी अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. गोरगरिबांसाठी अन्नदान व सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
मिनाज शेख (पुणे) या नर्सिंग ब्युरोच्या संचालिका असून गोरगरीब, वृद्ध महिला व युवतींना दर्जेदार आरोग्य सेवा देत रोजगार निर्मितीसाठी त्या सातत्याने कार्य करत आहेत.
अमोल काटे (पुणे) हे जाणीव फाऊंडेशनच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, हेल्मेट वापर, शॉर्ट फिल्मद्वारे सामाजिक प्रबोधन तसेच रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे कार्य करीत आहेत.
सेंट सेव्हिअर्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, अहिल्यानगर ही शैक्षणिक संस्था सन 1885 पासून कार्यरत असून 140 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून अध्यापन केले जाते. इयत्ता दहावी व बारावीचा निकाल सातत्याने 90 टयांहून अधिक लागतो. प्राचार्या ज्योत्सना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण, संगणक प्रयोगशाळा व अनुभवी शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शाळा कार्यरत आहे. अनाथ, गरजू व विधवा महिलांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, वसतिगृह व विविध मदतीचे उपक्रम राबविले जातात. प्रार्थना, प्रकाश, पावित्र्य हे शाळेचे बोधचिन्ह आहे.
प्रा. डॉ. अश्विनी वठारकर (पुणे) या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण, साहित्य संशोधन व सामाजिक कार्य या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पत्रांचे सादरीकरण, चर्चासत्रात सहभाग तसेच संशोधक लेखिका म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
पुरस्कारार्थींच्या कार्याची सखोल पाहणी करून निवड समितीने ही निवड केली. या समितीत प्रा. सुनील मतकर, ॲड. प्रशांत साळुंके, मेजर भीमराव उल्हारे, डॉ. इसाबाई शेख, रजनीताई ताठे, दिग्दर्शक तुषार रणनवरे व ॲड. महेश शिंदे यांचा सहभाग होता.
