मातंग समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान
वधु-वर मेळाव्यातून समाज एकत्र आणण्याचे कार्य कौतुकास्पद -भगवान जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय निशुल्क मुक्ता मातंग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि.17 सप्टेंबर) होणाऱ्या या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उत्तम शेलार व यांनी दिली.
मातंग समाजाचा वधु-वर परिचय मेळावा प्रा. बाबासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मातंग समाजाचे नेते तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, जगन्नाथ आव्हाड, बाळासाहेब तोरणे उपस्थित राहणार आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात प्रथमच मातंग समाजाचा वधु-वर परिचय मेळावा होत आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. मातंग समाजातील सुशिक्षित नव वधु-वर, विदुर, विधवा, घटस्फोटीत महिला व पुरुषांना योग्य जोडीदार निवडता यावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी उपवर मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन मुक्ता वधु-वर परिचय मंडळ प्रमुख बाळासाहेब गायकवाड, किशोर त्रिभुवन, एकनाथ आव्हाड, निलेश क्षीरसागर, रघुनाथ जाधव, बाबासाहेब लालझरे, अनिल गायकवाड आदींनी केले आहे.
मातंग समाजामध्ये विवाहसाठी स्थळ जुळविण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. समाज विखुरलेला असताना समाज एकत्र आणण्याचे कार्य या उपक्रमाने होणार आहे. तर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते भगवान जगताप यांनी व्यक्त केली. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि मातंग अस्मिता शिक्षक ग्रुप, मातंग कर्मचारी ग्रुप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग्रुप, श्रीरामपूर संस्थांचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. अधिका माहिती व नाव नोंदणीसाठी निलेश क्षीरसागर 8229984511 व प्रमोद शेलार 9423563403 यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
