पं. नागेश आडगावकर यांच्या गायनाने अहिल्यानगरकर रसिक मंत्रमुग्ध; कला रसिकांची महोत्सवला दाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित नगारा संगीत महोत्सवाला महाराष्ट्रभरातून कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करुन गायन क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येते.
सोमवारी दि. 19 जानेवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा व राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धा (वैयक्तिक) या स्पर्धा संपन्न झाल्या. राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत पुणे येथील चि. रूपक कुलकर्णी याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत काष्टी येथील परिक्रमा पब्लिक स्कूल, यांनी बाजी मारली.
राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत (वैयक्तिक) प्रथम क्रमांक- चि. रूपक कुलकर्णी (पुणे), द्वितीय क्रमांक- कु. श्रेया गाढवे (पुणे), तृतीय क्रमांक- कु.शाल्मली भालेराव (अहिल्यानगर), उत्तेजनार्थ- कु. दामिनी देवढे ( छ.संभाजीनगर ), विशेष पारितोषिक – गौरी इंगळे (अहिल्यानगर).
राज्यस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक- परिक्रमा पब्लिक स्कूल (काष्टी, श्रीगोंदा), द्वितीय क्रमांक- दि.आयकॉन पब्लिक स्कूल (नगर), तृत्तीय क्रमांक- अनामप्रेम संस्था (अहिल्यानगर), उत्तेजनार्थ- विठ्ठल माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय (माहिजळगाव), विशेष पारितोषिक- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव (श्रीरामपूर) यांनी पटकाविले.
सदर कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे साहेब, खजिनदार ॲड.दीपलक्ष्मी म्हसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संस्थेच्या सदस्या निमाताई काटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, संचालक डॉ.बी.एच.झावरे यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
या स्पर्धांचे उत्कृष्ट परीक्षण डॉ. नीरज करंदीकर, सौ.वर्षा पंडित, सौ.शुभांगी मांडे व श्री. हर्षद भावे यांनी केले. सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. नागेश आडगावकर यांची शास्त्रीय गायनाची मैफल पार पडली. सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना नगारा संगीत महोत्सवाची लोकप्रियता प्रतिवर्षी वाढत आहे आणि शास्त्रीय संगीताचे जे राष्ट्रीय स्तरावर महोत्सव घेतले जातात त्यामध्ये ‘नगारा संगीत महोत्सवाचे’ नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे महाविद्यालयाची संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठी प्रतिष्ठा होत आहे, असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व या नगारा संगीत महोत्सवाची व्याप्ती पुढील काळात खूप वाढेल अशा शुभेच्छा दिल्या. मैफिलीच्या सुरुवातीस पं. नागेश आडगावकर यांनी ‘राग नंद’ ने केली आणि नंतर किरवाणी रागातील “क्या जादू डारा दिवाना” ही ठुमरी सादर केली नंतर “घेई घेई माझे वाचे”, “समयासी सादर व्हावे” असे अभंग सादर करून मैफिलीच्या शेवटी “आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा” या अभंगाने मैफिलीची सांगता केली. त्यांना तबल्यावर श्री.रोहन पंढरपूरकर, संवादिनीवर श्री.स्वानंद कुलकर्णी, पखवाजवर श्री.रोहित खवळे, व्हायोलीनवर संजुक्ता फुकान, स्वरसाथ श्री प्रफुल्ल सोनकांबळे व प्रा.योगेश अनारसे यांनी समर्पक अशी साथसंगत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ढोकणे यांनी केले. आभार संगीत विभागप्रमुख प्रा. आदेश चव्हाण यांनी मानले. या संपूर्ण नगारा संगीत महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य, डॉ.संजय कळमकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिल आठरे, प्रबंधक बबन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागप्रमुख प्रा. आदेश चव्हाण, प्रा. अभिजीत अपस्तंभ, प्रा. योगेश अनारसे, प्रा. कल्याण मुरकुटे, नगारा संगीत महोत्सव समितीचे सर्व सदस्य, संगीत विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
