स्व. माधवराव मुळे आबा फक्त शिक्षणमहर्षी नव्हे, तर समाजमहर्षी होते -ॲड. विश्वासराव आठरे
जिल्ह्यातून 6 हजार स्पर्धक सहभागी; विजेत्यांना बक्षीस वितरण
नगर (प्रतिनिधी)- स्व. माधवराव मुळे आबा फक्त शिक्षणमहर्षी नव्हे, तर समाज महर्षी होते. जात-पात व धर्मापलीकडे जाऊन त्यांनी कार्य केले. बहुजन समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या विचाराने त्यांचे योगदान व विचार आजही प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे यांनी केले.
शिक्षण महर्षी माधवराव मुळे प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ॲड. आठरे बोलत होते. अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या सभागृहात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ विश्वस्त सिताराम (अण्णा) खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार प्रकाश गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेशदादा मुळे, उपाध्यक्ष प्राचार्य दत्ता पाटील नारळे, प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे, डॉ. महेश मुळे, मीनाताई पोटे, आदी उपस्थित होते.
पुढे ॲड. आठरे म्हणाले की, माधवराव मुळे आबा यांनी धोरणी नेतृत्व घेऊन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले. अशा व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून समाज पुढे जातो. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला चांगले दिवस आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संस्थेत बंद पडलेल्या सहकारी ग्राहक भंडाराला उर्जित अवस्थेत आणून संस्थेच्या विकासात मोलाची भर टाकली व जिल्ह्यात एक नंबर संस्था नावरुपास आणण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे यांनी शिक्षण महर्षी स्व. माधवराव मुळे यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 6 हजारपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत शैक्षणिक संस्थांच्या विद्यालयांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांसह दहावी व बारावी गुणवंतांचा सन्मान, करियर मार्गदर्शन केले जाते.
पर्यावरण ,आरोग्यविषयक उपक्रम राबवतात, पुरोगामी, समाजवादी विचार पुढे घेऊन प्रतिष्ठान माधवराव मुळे आबांच्या विचारधारेने पुढे जात असल्याचे ते म्हणाले.
सिताराम आण्णा खिलारी म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रातील संत महात्म्यांनी कर्माचा सिध्दांत मांडला. कोणत्याही क्षेत्रात असो, ते काम प्रामाणिक केले पाहिजे. माधवराव मुळे यांच्या कृती व कार्यातून त्यांचे कर्म दिसतात. ग्रामीण भागातून शहरात येऊन त्यांनी आपल्या कार्याने मराठा माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली. बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस महाविद्यालयाने गुणात्मक व संख्यात्मक दर्जा मिळवला . ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी कार्य केल्याचे ते म्हणाले.
प्रकाश गांधी म्हणाले की चित्रकलेने एक व्हिजन समोर उभे राहते. प्रत्येक क्षेत्रात नवीन कलाकृती उभी करताना सर्वात अगोदर चित्र निर्माण होते. तर निबंधातून विचार करण्याची क्षमता वाढते. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश दादा मुळे यांनी यावेळी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या,
प्रारंभी दीपप्रज्वलनाने व स्व. माधवराव मुळे यांच्या प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. चित्रकला व निबंध स्पर्धा प्रत्येकी तीन गटात झाली. चित्रकला स्पर्धेस 2628 तर निबंध स्पर्धेसाठी 3726 असे एकूण 6354 स्पर्धकांचा सहभाग लाभला.
चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी होती. तर निबंध स्पर्धा शालेय व खुल्या गटापर्यंत होती. यामध्ये शिक्षक, पालक व प्राध्यापकांसाठी स्वतंत्र गट निर्माण करण्यात आला होता. दोन्ही स्पर्धेसाठी ज्वलंत, सामाजिक व परिवर्तनवादी विषय देण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षीसाचे स्वरुप होते. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सचिन सांगळे, नारायण शेळके, स्वप्निल मालवंडे, निलेश गणगले, अर्चना निमसे, शारदा पाटील तर निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. दत्तात्रय नकुलवाड, डॉ. नरेंद्र वाव्हळ, जगन्नाथ नारळे, सविता सानप, मिराबाई मोरे, प्रा. गणेश भगत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. आभार प्राचार्य दत्ता पाटील नारळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, बजरंग पाडळकर, लालचंद हराळ, सुनील म्हस्के, महेश मुळे, दिनकर मुळे, निलेश जासूद, सागर देवकर, संतोष आव्हाड, सिकंदर सय्यद आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य, सभासद, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
