आरोग्यसेवेचा वसा जपून समाज निरोगी करण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -रतिलाल कटारिया
त्वचारोग अंगावर न काढता तात्काळ निदान व उपचार करण्याचे तज्ञ डॉक्टरांचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेचा वसा जपून समाज निरोगी करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहचवित आहे. हॉस्पिटलची रुग्णसेवा सर्वसामान्य घटकातील रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. माणुसकीच्या भावनेने उभे राहिलेल्या या सेवाकार्यात योगदान देऊन समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन रतिलाल कटारिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त रतिलाल कटारिया व कटारिया परिवाराच्या वतीने मोफत त्वचारोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी कटारिया बोलत होते. यावेळी डॉ. विजय भंडारी, सुभाष मुनोत, परेश मंडलेचा, संतोष बोथरा, सतीश (बाबुशेठ) लोढा, वसंत चोपडा, मानकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, त्वचारोग तज्ञ डॉ. अमित शिंदे, डॉ. भास्कर पालवे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, अनेक खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची रुग्णसेवा सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. ही सेवा सर्वसामान्यांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागत आहे. रतिलाल कटारिया व कटारिया परिवाराचे हॉस्पिटलच्या स्थापनेपासून सहकार्य राहिले आहे. या सेवाकार्यासाठी त्यांनी भरीव निधी देऊन जनसेवेचा वसा जपला असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. विजय भंडारी म्हणाले की, आरोग्यसेवा महत्त्वाची असून, पैसा हा दुय्यम आहे. पैश्याअभावी उपचार थांबू नये, या प्रामाणिक हेतूने हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. मानवसेवेच्या भावनेने लावण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या रोपाचे वटवृक्ष बहरले आहे. या कार्यासाठी माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांचे नेहमीच सहकार्य राहिले. त्यांच्या प्रेरणेने या कार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
त्वचारोग तज्ञ डॉ. अमित शिंदे व डॉ. भास्कर पालवे यांनी त्वचारोग अंगावर न काढता तात्काळ त्याचे निदान व उपचार केल्यास पुढील धोके टाळता येतात. त्वचा रोगाला वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण शरीरावर पसरण्याची भिती असते. यासाठी हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या व तज्ञ डॉक्टर उपलब्ध असून, याचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
या शिबिरात 80 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजूंना विविध तपासण्या अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत या शिबिरास प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. शेवटी हॉस्पिटलमध्ये उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.