आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरची सेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी -अशोक भंडारी
222 रुग्णांची मोफत हृदय तपासणी
नगर (प्रतिनिधी)- कमी वयात हृदय रोग होण्याचे प्रमाण वाढले असून, तत्पर व उच्च दर्जाची आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरची सेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. वाढत चाललेले हृदय रोगाचे प्रमाण पाहता, समाजाची गरज ओळखून हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सुरु असलेल्या आरोग्यसेवेमुळे हॉस्पिटलचे नाव महाराष्ट्रात नावाजले आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या या आरोग्यसेवेने आनंदऋषीजी हॉस्पिटलने सर्वसामान्यांच्या हृदयात घर करुन मोठा विश्वास संपादन केला असल्याची भावना अशोक भंडारी यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त स्व. रूपीबाई मोतीलाल बोरा व स्व. शांताबाई मोहनलाल भंडारी यांच्या स्मृतिपित्यर्थ अशोकलाल मोहनलाल भंडारी व भंडारी परिवाराच्या वतीने आयोजित हृदय रोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी भंडारी बोलत होते. यावेळी महेश सचदेव, अंजली सचदेव, मेहुल (टिनू) भंडारी, परेश मंडलेचा, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश (बाबुशेठ) लोढा, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, सुभाष मुनोत, हृदय रोग तज्ञ डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. अमित थोपटे, डॉ. विनय छल्लाणी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, मनुष्याच्या जीवन पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने झपाट्याने आजाराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वेळोवेळी तपासणी व उपचार आवश्यक झाले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलने एका छताखाली सर्व आरोग्यसेवा आणून समाजातील गोर-गरीबांना आधार दिला आहे. या आरोग्यसेवेच्या कार्यात भंडारी परिवाराचे सातत्याने योगदान मिळत आहे. आरोग्याच्या प्रत्येक सेवाकार्यात हा कुटुंब हातभार लावत असल्याचे त्यांनी कौतुक केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ञ डॉक्टर व नव्याने वैद्यकिय शिक्षण घेऊन निष्णात युवा डॉक्टर या आरोग्य चळवळीत सहभागी झाले आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे कार्य या आरोग्य मंदिरातून होत आहे. हॉस्पिटलचे हार्ट सर्जरी सेंटर गुणवत्तेमुळे नावाजले असून, 25 हजारपेक्षा जास्त बायपास सर्जरी, 50 हजारपेक्षा अधिक एन्जोप्लास्टी व 1 लाखापेक्षा अधिक अँजिओग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आलेल्या आहेत. रुग्णांना उपचाराबरोबर मायेने जवळ करून त्यांच्याशी जिव्हाळा जपला जात असल्याचेही डॉ. कांकरिया यांनी सांगितले.
अंजली सचदेव म्हणाल्या की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात गोरगरिबांची सेवा घडत आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राहुल अग्रवाल म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये अल्पदरात सेवा देताना सर्वोत्तम दर्जा देखील राखला जातो. दर्जाबाबत तडजोड न करता, रुग्णांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सर्वोत्तम सेवा देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन सज्ज आहे. शस्त्रक्रियेत इम्पोर्टेड साधने वापरुन मोठ्या शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक मशीनरी हॉस्पिटलमध्ये सज्ज आहेत. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात 222 रुग्णांची हृदय रोग तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश छल्लाणी यांनी केले. आभार सतीश (बाबुशेठ) लोढा यांनी मानले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….